मोदी सरकारमुळे प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचे काम – आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल दि.१४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत महत्त्वकांशी योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्या अनुषंगाने सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या धोरणांतर्गत अनेक योजनांची यशस्वी अमंलबजावणी करत तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचे काम मोदी सरकारमुळे होत आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे केले.

ई-श्रम कार्ड ही आणखी एक महत्त्वकांशी योजना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत राबवली जात आहे. त्यानुसार पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात ‘ई-श्रम कार्ड मोफत नोंदणी केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी त्यांनी ‘ई-श्रम कार्ड मोफत नोंदणी केंद्र’ च्या उपक्रमाबद्दल युवा मोर्चा व आत्मनिर्भर टीमचे कौतुक केले. त्याचबरोबर या उपक्रमातून असंघटित कामगारांना मोठी ताकद मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.

    या कार्यक्रमास युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, आत्मनिर्भर भारत महाराष्ट्र प्रदेश संयोजक हर्षल विभांडीक, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, आत्मनिर्भर भारत कोंकण विभाग संयोजक विनय सावंत, ऍड. सहसंयोजक राखी बरोत, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक व शहर सरचिटणीस नितीन पाटील, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेविका रुचिता लोंढे, कामगारनेते जितेंद्र घरत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय समेळ, शहराध्यक्ष रोहित जगताप, आत्मनिर्भर जिल्हा संयोजक आकाश भाटी, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, चंद्रकांत मंजुळे, राजेंद्र कोळी, मधुकर उरणकर यांच्यासह कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

    आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले कि, १३० कोटीपेक्षा जास्त जनता आपल्या देशात आहे. यातील प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार काम करीत आहे. पूर्वीच्या सरकारला निवडणुका आल्यावर जनतेची आठवण यायची मात्र मोदी सरकार कुठलेही राजकारण न करता अहोरात्र जनतेच्या सेवेत गुंतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी गरिबांचा विचार करून अनेक लोकोपयोगी योजना अंमलात आणून यशस्वी केल्या. कोरोनाचे महासंकट जगावर आले असताना देशाला संकटाला सामोरे जाण्याची ताकद आणि विश्वास त्यांनी देत सर्वतोपरी मदतही केली आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी अधोरेखित केले. केंद्र सरकारने नागरिकांच्या हितासाठी वेळोवेळी चांगले निर्णय घेतले परंतु राज्यातील महाविकास आघाडीने जनतेच्या पदरी फक्त निराशा दिली आहे, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार प्रत्येक स्तरावर अपयशी ठरले आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!