रहिवासी कामगार त्रस्त, वाहन चालकांवर कारवाईची मागणी
कळंबोली दि.१४ : तळोजा औद्योगिक वसाहतीतून जाणाऱ्या मुख्य मार्गावरच अनेक चालक बेकायदेशीर वाहने उभी करीत आहेत. चक्क रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, याचा नाहक त्रास वाहन चालक आणि नागरिकांना सहन करावा लागत आहे. शिवाय अपघात होत आहेत आणि अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याकडे वाहतूक शाखेचे जानीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून या बेपर्वा रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी केली आहे.
आशिया खंडातील सर्वाधिक मोठ्या गणल्या जाणाऱ्या तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये ११०० पेक्षा जास्त कारखाने असून या कारखान्यात येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. त्यात या रस्त्यावरून ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडीसाठी जाणारी वाहने याच रस्त्यावरून जाता आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून येजा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. येथील कारखान्यात येणारी वाहने सुरक्षित आणि संरक्षणात राहावी म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने करोडो रुपये खर्च करून तोंडरे गावाजवळ पे अँड पार्क वाहनतळ उभारला आहे. त्यामध्ये १२० अवजड वाहने उभी करता येतील एवढी जागा आहे. पण तेथे हि वाहने उभी न करता ती मुख्य रस्त्यावर केली जात आहेत.
या वसाहतीत मुख्य रस्त्यावर तळोजा पोलिस वाहतूक शाखे ते रामकिशन नाका, हिंदाल्को कंपनी, बॉम्बे ब्रेवरिज कंपनी जवळील रस्त्यावर तर वाहनतळच बनविण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता शोधावा लागतो. वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. या रस्त्याच्या बाजूला असलेले मारुती सुझुकी विशिंग सेंटर आहे. या सेंटर मध्ये येणाऱ्या गाड्या या रस्त्यावरच उभ्या राहत असल्याने येथे सततची वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. या वॉशिंग सेंटर चालकावर शासकीय वरदहस्त असल्याने तेथे येणाऱ्या गाड्यांवर कोणतीच कारवाई केली जात नसल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिक, कारखाना मालक, कामगार देत आहेत. त्यामुळे याकडे संबंधितांनी लक्ष देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
‘पे अँड पार्क मध्ये वाहने उभी करायचे सोडून वाहन चालक मुख्य रस्त्यावर वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, पादचारी नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय पार्किंगसाठी वाहनतळ उभारण्यात आला असताना गाड्या उभ्या करत असल्याने अडचणीत वाढ होत आहे. याकडे संबंधित प्रशासकीय विभागाने लक्ष देऊन समस्या सोडवाव्यात’. – किरण पाटील (सामाजिक कार्यकर्ते)
‘येथील मुख्य रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल.’ – दिलीप चव्हण (वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळोजा वाहतूक शाखा)