नवीन पनवेल वाहतूक शाखेकडून जनजागृती
कळंबोली दि.१४: मकर संक्रांति निमित्त तिळगुळ घ्या गोड बोला असे आपण अनाधिकालापासून बोलत आले आहोत. पण मकर संक्रांतीनिमित्त नागरिक आणि पोलिसांमधील गोडवा वाढवण्यासाठी तिळगुळ घ्या गोड बोला पण वाहतुकीचे नियम कायदे पाळा असे गोड बोलून नवीन पनवेल वाहतूक शाखेने वाहन चालकांना तिळगुळ देऊन वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. आज दंडात्मक कारवाई न करता त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला वाहन चालकांनी ही उत्स्फूर्त प्रतिसाद देत नियमांचे उल्लंघन न करण्याची ग्वाही वाहतूक शाखेच्या अंमलदारांना दिली.
केंद्र व राज्य सरकारने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विरोधात कडक कायदे केले आहेत. दंडाच्या रकमा सुद्धा वाढवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर संबंधितांना न्यायालयात हजर करणे बंधनकारक केले आहे. याव्यतिरिक्त ई चलन द्वारे मोठ्या संख्येने कारवाया केल्या जात आहेत. असे असले तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या मात्र कमी होताना दिसत नाही. बेशिस्त चालकांमुळे अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. यामुळे कित्येकांचा नाहक बळी जात आहे. अपघातामध्ये अपंगत्व येणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. अशा घटना टाळण्यासाठी शिस्तीने वाहन चालवणे आवश्यक आहे. नवी मुंबई वाहतूक पोलीसांकडून हजारो वाहनांवर कारवाई करून कोट्यावधी रुपयांचा दंड वसूल केला गेला किंवा इ चलनाद्वारे संबंधितांना पाठवण्यात आले. तरीसुद्धा काही वाहनचालक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत आहेत. दरम्यान आज मकर संक्रांति निमित्त नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, सहाय्यक आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज पाटील यांच्या सूचनेनुसार 14 जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक सुशांत खराटे यांच्यासह अंमलदार संजय गावडे, सुनील पाटील, शैलेंद्र तंवर यांनी वाहन चालक-मालक यांना वाहतुकीचे नियम पाळणे बाबत संबोधित करून तिळगुळ वाटप केले.
वाहन चालवत असताना मोबाईलवर न बोलणे, सेफ्टी बेल्ट लावणे, हेल्मेट परिधान करणे, लेन कटिंग न करणे, सिग्नल पाळणे याशिवाय इतर वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती केली. तिळगुळ घ्या वाहतुकीचे नियम पाळा असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले.