बेकायदेशीर वृक्षतोड, पावसाळी वृक्ष पडझडीमुळे वातावरणात बदल
माथेरान दि.४ (मुकुंद रांजणे) काही वर्षांपासून माथेरान मध्ये अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या हॉटेल्समध्ये बेसुमार वृक्षतोड करण्यात आलेली दिसत आहे. तर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सुध्दा जुनी झालेली झाडे मुळासहित उन्मळून पडत आहेत त्यामुळे इथल्या वातावरणात बदल झाला असून पावसाळ्यात सुध्दा याठिकाणी पंखा लावल्याशिवाय चैन पडत नसून पर्यटक सुध्दा हॉटेल तसेच घरगुती लॉज मध्ये नेहमीच एसीची मागणी करताना दिसत आहेत.
दोन दशकांपासून येथील व्यवसायात मंदीचे सावट दिसत असल्यामुळे काही हॉटेल धारकांनी तसेच बंगले मालकांनी आपले जुने बंगले विकले आहेत. याच जुन्या बंगल्याच्या जागी अलिशान हॉटेल्स उभारण्यासाठी अनेकदा येथील राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादाने सर्रासपणे वृक्षतोड करण्यात आलेली असून वनखात्याच्या जागा सुध्दा बळकावण्यात आल्या आहेत. तर परिसरातून पोट भरण्यासाठी आलेल्या मंडळीनी आता इथेच आपले कायमचे बस्तान मांडल्यामुळे त्यानी सुध्दा जागा मिळेल त्याठिकाणी भरमसाठ वृक्षतोड करून एकमजली घरे उभारली आहेत. नव्याने सुध्दा हॉटेल बांधण्यात येत असून दिवसाढवळ्या झाडांची कत्तल केली जात आहे. स्विमिंग पूल बांधण्यासाठी अडसर ठरणारी मोठमोठी जुनी झाडे कुऱ्हाडीचा आवाज होऊ नये यासाठी करवतीच्या साहाय्याने मुळासहित कापत आहेत.दस्तुरी या मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या ठिकाणी असंख्य झाडे कशामुळे सुकून गेली आहेत यावर वनखात्याने, वन समितीने लक्ष केंद्रित करणे गरजेचे बनले आहे. या सर्व बाबींवर संबंधित अधिकारी वर्ग तसेच नेमून दिलेल्या समितीच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. नुकताच मेघदूत हॉटेलमध्ये सुध्दा अशाचप्रकारे झाड पाडण्यात आले आहे याबाबत येथील वनखात्याच्या अधिकारी वर्गास विचारणा केली असता आम्ही वरिष्ठांना कळविले असल्याचे सांगण्यात आले आहे तर वन समितीचे अध्यक्ष योगेश जाधव यांनी सुध्दा अशाचप्रकारे उत्तर देऊन आपले कर्तव्य पार पाडले आहे.


सदर झाड सुकलेले असून ते तोडल्या प्रकरणी वृक्षतोड अधिनियम १९६४ नुसार वृक्षतोड करणाऱ्या मालकावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. उमेश जंगम–वन क्षेत्रपाल

माथेरान परिसरातील वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला असून उन्हाळ्याच्या एप्रिल महिन्यात ३८ अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदविण्यात आले आहे याबद्दल स्थानिकांनी चिंता व्यक्त केली असून वृक्षतोड वर काहीतरी उपाययोजना करावी यासाठी पर्यावरण प्रेमी नागरिक राकेश कोकळे यांनी काही दिवसांपूर्वी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबईत भेट घेतली होती.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!