कळंबोली दि.२२ (दीपक घोसाळकर) तळोजा औद्योगिक वसाहतीला नावडे गावाकडून कडून जोडणाऱ्या कोकण रेल्वे वरील उड्डाणपुलाला भले मोठे भगदाड पडल्याने वाहतुकीच्या आणि बांधकामाचा प्रश्न हा जटिल बनला आहे. सदरचा उड्डाणपूल हा १८ ते २० वर्षापूर्वी बांधण्यात आल्याचे समजते. मात्र आता या पुलाला मधोमध भले मोठे भगदाड पडल्याने वाहन चालकांना जीवावरची कसरत करून वाहन चालवावी लागत आहेत. दुचाकीस्वारही या खड्ड्यामध्ये आपटून जखमी झालेले आहेत. संबंधित प्रशासनाने या पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा उड्डाण पुलाला पडलेल्या भगदाडाचे स्वरूप हे मोठ्या रूपात होण्याची भीती वाहन चालकांनी व्यक्त केली आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी नावडेकडून उड्डाणपूल बांधण्यात आलेला आहे. रेल्वे क्रॉसिंग वर उड्डाणपूल असल्याने व औद्योगिक वसाहतीकडून वसाहतीमध्ये तसेच कल्याण डोंबिवली कडे जाण्यासाठी या उड्डाणपुलाचा मोठ्या प्रमाणावर वाहनचालकांकडून वापर करण्यात येत आहे. मात्र या उड्डाणपुलाला प्रथम या पावसाळ्याच्या सुरुवातीला थोडाफार उखडला होता. उखडलेल्या भागावर व खड्ड्यावर पेवर ब्लॉक लावून मलमपट्टी ही करण्यात आली होती. मात्र या ठिकाणी असलेल्या अवजड व अति वाहनांच्या वर्दळीमुळे या पडलेल्या खड्ड्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे आता या खड्ड्याचं रूपांतर हे भल्या मोठ्या भगदाडात झाले आहे. सदर उड्डाणपुलाला मधोमध पडलेले भगदाड हे तब्बल तीन ते साडेतीन फूट व्यासाचे आहे. पुलांमध्ये काँक्रीट मध्ये वापरण्यात आलेल्या लोखंडी सळया उघड्या दिसू लागल्या आहेत.