पनवेल दि.२०: महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय शिवगान २०२१’ स्पर्धेत उत्तर रायगड जिल्ह्याने सांघिक स्पर्धेत ‘विजेतेपद किताब’ पटकाविले. तसेच प्राथमिक फेरीच्या उत्कृष्ट नियोजनाचा प्रथम क्रमांकचे पारितोषिकही पटकवून उत्तर रायगड जिल्हयाने महाराष्ट्र्रात अव्वल क्रमांकाची अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
सामगंध कला केंद्र पनवेल यांनी सांघिक गटात सातारा येथे झालेल्या अंतिम फेरीत उत्तर रायगड जिल्ह्याचे नेतृत्व केले. या संघाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार छ. श्रीमंत उदयनराजे भोसले, सांस्कृतिक सेलचे प्रदेश अध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, प्रदेश प्रभारी लक्ष्मण सावजी आदी मान्यवरांच्या हस्ते ०१ लाख रुपये, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी प्रदेश सदस्य सुनिल सिन्हा, कोकण संयोजक राहुल वैद्य, सहसंयोजक दीपक पवार, आदी उपस्थित होते. सांघिक प्रथम पारितोषिक सामगंध कला केंद्राच्या टीमने तर उत्कृष्ठ नियोजनाचा पुरस्कार सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, पनवेल सहसंयोजक गणेश जगताप, संजीव कुलकर्णी यांनी स्विकारला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्तिगीत, आरती, ओवी, ललकारी,अभंग, आदी प्रकारच्या गीतांचा समावेश असलेल्या या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश भाजपा सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या स्पर्धेत उत्तर रायगड जिल्ह्याकडून चमकदार कामगिरी व्हावी, यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शखाली उत्तर रायगड जिल्हा प्राथमिक फेरी स्पर्धा पार पडली होती. त्यामधून सांघिक गीत गायन स्पर्धेत सामगंध कला केंद्र पनवेलने प्रथम क्रमांक पटकाविला होता. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी सातारा येथील झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सामगंध कला केंद्र पनवेलने सांघिक गटातून उत्तर रायगड जिल्ह्याचे नेतृत्व केले. उत्तम सादरीकरण करून रायगडच्या संघाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला, त्यामुळे रायगडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.