पनवेल दि.७: बालनृत्यांगनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, कथक या नृत्यप्रकाराविषयी जनजागृती निर्माण करणे व कथकचा प्रसार करणे या उद्देशाने पनवेल कल्चरल सेंटरने सलग दुसर्‍या वर्षी राज्यस्तरीय सोलो कथक नृत्य स्पर्धेचे आयोजन नवीन पनवेलच्या कर्नाटक संघ सभागृहात नुकतेच केले होते.
या स्पर्धेत राज्यभरातून तब्बल 52 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेच्या गट 1 मध्ये तेजस्विनी झवेरीे हिला प्रथम (पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र), सृजन धर्माधिकारी हिला द्वितीय (तीन हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र) आणि मैथिली वेंगुर्लेकर हिला तृतीय (दोन हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र) पारितोषिक देण्यात आले. याशिवाय आर्या पाटील व हृदया चव्हाण या दोघींना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. गट 2 मध्ये अनुष्का परुळेकर हिला प्रथम तर स्वरा गोंधळेकर हिला द्वितीय पारितोषिक देण्यात आले. गट 3 मध्ये क्षितिजा बाम हिला प्रथम, स्वरांगी वेलणकर हिला द्वितीय तर अर्चिता छेडा हिला तृतीय पारितोषिक देण्यात आले. बोरिवली-मुंबईच्या वरदा पंडित आणि पुण्याच्या केतकी शहा या कथक क्षेत्रातील दोन दिग्गज व्यक्तींनी स्पर्धेचे परीक्षण आणि स्पर्धकांना मार्गदर्शन केले. केतकी शाह यांनी पदन्यासाचे महत्व अधोरेखित केले तर वरदा पंडित यांनी अभिनय व रियाझाचे. वरदा पंडित म्हणाल्या, तुमच्या नृत्याच्या पार्श्‍वभूमीवर जे गीत-संगीत वाजत आहे त्यातले भाव तुमच्या चेहर्‍यावर व देहबोलीतून उमटले पाहिजेत.
पनवेल कल्चरल सेंटरच्या नृत्यविभाग प्रमुख श्रीकला जोशी यांनी या स्पर्धेचे अतिशय नेटके आणि काटेकोर नियोजन केले होते. पनवेल कल्चरल सेंटरचे अध्यक्ष मिलिंद गोखले तसेच तसेच परीक्षक वरदा पंडित आणि केतकी शहा यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!