महाराष्ट्र बारव मोहिमेचा उपक्रम
पनवेल दि.२८: महाराष्ट्रातील पुरातन वारसा असलेले प्राचीन काळातील बारवा, पाय विहीरी, कुंड, पुष्करणी आदी जलस्रोतांचे येत्या महाशिवरात्रीला पुजन करून या ठिकाणी १ मार्च रोजी महाशिवरात्रीला दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण १६० बारवांवर राबविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र बारव मोहिमेचे प्रमुख रोहन काळे यांनी दिली. महाराष्ट्र बारव मोहिमेअंतर्गत पुरातन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या प्राचीन काळातील बारवा शोधून त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात. या मोहिमेसाठी दोन उच्च शिक्षीत तरुण रोहन काळे आणि मनोज सिनकर यांनी पुढाकार घेत आजवर महाराष्ट्रातील १५०० पेक्षा जास्त बारवा स्थानिक इतिहासकार, दुर्गप्रेमी, वारसा प्रेमींच्या सहकार्याने शोधून त्यांची नोंद गुगल नकाशावर केली.

पनवेल तालुक्यातील कुडावे गाव येथे मराठा कालीन बारव म्हणजेच पाय विहीर आहे. या ठिकाणीही १ मार्च रोजी महाशिवरात्रीला बारवचे पुजन करून दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या करिता पनवेल मधील सागर मुंडे, भाग्यश्री परदेशी तसेच बारव संवर्धन मोहिमेतील त्यांचे सहकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मिळून हा दिपोत्सव साजरा करतात.
महाराष्ट्रातील जवळपास १६० पेक्षा जास्त बारवा दिव्यांची रोषणाई करून सजविण्यात येणार आहेत. गावोगावी असणारा हा मोठा ऐतिहासिक वारसा आज दुर्लक्षित होत चालला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती होऊन लोकांनी या पुरातन जलस्रोत संवर्धीत करून हा वारसा जपण्यासाठी गावोगावी चळवळी उभा रहाव्यात हा हेतू घेऊन महाशिवरात्रीला या दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील ३८, विदर्भ १६, मराठवाडा ३४, कोकण ३५, दक्षिण महाराष्ट्र २८, उत्तर महाराष्ट्र ९ अशा एकूण १६० पेक्षा जास्त ठिकाणांवर महाराष्ट्रातून २७ जिल्ह्यातील स्थानिक वारसाप्रेमी, दुर्ग संवर्धन संस्थांच्या माध्यमातून महाशिवरात्रीला दिवे प्रज्वलित करून दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!