गोरेगाव फिल्मसिटी पाहणार कामकाज
कर्जत दि.30: (अजय गायकवाड) दिवंगत प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्याच्या मध्यवर्ती असलेला एनडी स्टुडिओ हा राज्य सरकारच्या ताब्यात गेला आहे. यासाठी नुकताच सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी स्टुडिओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी देखील केली आहे.nd स्टुडिओचे मालक तथा कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या एनडी स्टुडीओ मध्येच गळफास घेत आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान हाच एन.डी. स्टुडिओ आता परिचालनासाठी राज्य सरकारने ताब्यात घेतला असल्याचे समोर आलंय.
एनडी हा स्टुडिओ गोरेगाव फिल्मसिटीच्या ताब्यात देण्यात आला असून यावर आता महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ स्टुडिओचा ताबा राहणार आहे.दरम्यान या एनडी स्टुडिओची पाहणी करतेवेळी राज्याच्या सांस्कृतिक महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, यासह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, उप सचिव महेश व्हावळ, मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, उप अभियंता (स्थापत्य) विजय बापट, विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील, कक्ष अधिकारी अनिरुद्ध देशपांडे आदि अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाने (NCLT) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सादर केलेल्या ठराव प्रस्तावाला १४ नोव्हेंबर २०२४ रोजी मान्यता दिल्याने यापुढे एन. डी. स्टुडिओचे दैनंदिन प्रशासन, सुरक्षा, चित्रीकरणे, महसूल वाढ, लेखा विषयक कामे शासनाच्या वतीने महामंडळाच्या नियंत्रणाखाली सुरु राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. या कामकाजाची पाहणी करण्यासाठी खारगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एन. डी. स्टुडिओची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच येथील कार्यरत असलेल्या व्यवस्थापनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
दरम्यान एनडी साठी विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे.प्रशासकीय आणि विकासात्मक कार्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व्यवस्थापकीय संचालकांच्या सनियंत्रणाखाली विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आली असल्याचे यावेळी सांगितले आहे. या पथकामध्ये सह व्यवस्थापकीय संचालक समन्वयक, विशेष कार्यकारी अधिकारी उप समन्वयक, मुख्य प्रशासकीय अधिकारी, मुख्यलेखावित्तधिकारी, व्यवस्थापक कलागारे, उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत) आदि अधिकारी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. त्याच बरोबर वित्तीय, विधी, आयटी, मनुष्यबळ क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूनंतर प्रथमच स्टुडीओ मध्ये फुलवंती या मराठी चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले होते.
प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूनंतर शांत झालेले एनडी स्टुडीओ मध्ये प्रथमच मराठी चित्रपटाचे शूटिंग केले गेले होतें.स्नेहल प्रवीण तरडे दिग्दर्शित, प्राजक्ता माळी निर्मित ‘फुलवंती’हा चित्रपट होता.याबाबत स्वतः तरडे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली होती.’फुलवंती’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून तो चांगलाच प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरला आहे.