माथेरान दि.29: (मुकुंद रांजणे) पाऊस गेल्यानंतर राज्यात कडाक्याची थंडी पडली असून त्यामुळे रात्रीच्या वेळी गारठा अधिक जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रात सध्या कमालीची थंडी आहे. नाशिक, निफाड, धुळे या शहरांमध्ये कमाल आणि किमान तापमानात मोठी घट झाली आहे. यासोबतच येत्या काही दिवसांत संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
पर्यटन स्थळ माथेरान मधेही गुलाबी थंडी सुरू झाली असून या गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पावली माथेरान कडे वळली आहेत आजचे तापमान 14.4 अंश सेल्सिअस इतके असून या गुलाबी थंडीत पॉईंट सफरीचा आणि इथल्या नैसर्गिक सौंदर्याचा नयनरम्य देखावा न्याहालण्यासाठी पर्यटक पायी घोड्यावर अथवा हातरीक्षा मधुन वृध्द मंडळी जाताना दिसत आहेत.
मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात कंटाळलेले पर्यटक या मोसमात हमखास माथेरानला भेट देत असतात शनिवार आणि रविवार एक दिवसीय पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. याच माध्यमातून पॉईंट्स वरील लहान मोठ्या स्टॉल धारकांना चांगल्या प्रकारे उत्पन्न प्राप्त होताना दिसत आहे.