जेष्ठ नामधारक अरविंद पडवळ आणि विश्वस्त दिलीप महाजन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
कर्जत दि.२८: कर्जत ज्ञानपीठात सुरु असलेल्या आनंद मेळाव्याच्या पाचव्या दिवशी उद्योग हाच योग या विषयावर पॉडकास्ट फॉरमॅटवर आधारित चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये उद्योग क्षेत्रातील विविध समस्यांवर आदरणीय प्रल्हाद पै यांनी प्रेक्षकांना उत्तम असे मार्गदर्शन केले. प्रसिद्ध उद्योगपती समीर भांबेरे आणि रविराज कानडे यांनी यावेळी प्रल्हाद पैंना त्यांच्या क्षेत्रातील अनेक प्रश्न विचारले. प्रल्हाद पै यावेळी केलेले मार्गदर्शन ऐकताना सभागृहातील सर्व प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले होते.
उद्योग या शब्दातील योग हा शब्द युज या संस्कृत धातुपासून तयार झालेला आहे. योग म्हणजे जोडलं जाणे, योग म्हणजे संधी मिळणे, योगी होणे म्हणजे इतरांच्या उपयोगी पडणे. उद्योगातून माणूस कर्मयोग, स्वानंदयोग साध्य करू शकतो. त्यासाठी काय करायचं हे प्रल्हाद पैंनी अगदी सहज आणि सोप्या शब्दात मांडले. माणसाला साधारणपणे कोणतेही काम करताना कर्तुत्वाचा मद असतो आणि कामातून मिळणारे फळ मलाच मिळावे अशी अपेक्षा असते. पण जेव्हा तो कर्म करणारा कर्ता ईश्वर असून त्यातून मिळणारे कर्मफळ ईश्वरचरणी वाहतो तेव्हा तो खरा कर्मयोग साधतो. त्याचप्रमाणे माणसाने प्रत्येक कर्म हे राष्ट्रहितासाठी करावे हे देखील आवर्जून सांगितले. यासाठीच आमच्या जीवनविद्या मिशनचे घोषवाक्यही प्रत्येक कृती राष्ट्रहिताची, विश्वशांतीची असे आम्ही ठेवले आहे. उद्योगजकांनी उद्योग करताना उद्योजक, कर्मचारी, वेंडर आणि ग्राहक यांच्यासोबत आणखी समाज आणि निसर्ग या दोन घटकांचाही अवश्य विचार करावा असे त्यांनी नाविण्यपूर्ण विचार या मार्गदर्शनातून व्यक्त केले.
व्यवसाय करणे म्हणजे समाजाची गरज पूरवणे यासाठीच असा उद्योग निवडा ज्यातून समाजाची गरज पूर्ण होईल. नवीन उद्योग करताना त्याबद्दल नीट प्लॅनिंग करा, ट्रेनिंग घ्या, व्यवसायातील खाचखळगे जाणून घ्या. ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात यश मिळवणं सोपं जाईल. तसंच व्यवसाय करण्यासाठी चोविस तास बिझी राहण्याची गरज नाही. दिवसाचे आठ तास मनापासून काम करा ज्यामुळे तुम्हाला चोविस तास काम करण्याची गरजच लागणार नाही.
उद्योगातून पैसा कमवणे हा उद्देश असण्यापेक्षा आनंद मिळवणे हा उद्देश असावा. पैशांलाही भावना असतात यासाठी कर्मचाऱ्यांना पगार किंवा बोनस देताना, इंकम टॅक्स भरताना तो कृतज्ञतेच्या भावनेतून, मनापासून भरावा. दिल्याने येत आहे रे या निसर्ग नियमानुसार मग तुम्हाला भरभरून संपत्ती मिळेल असं ते म्हणाले.
कर्म करताना intelligence quotient आणि imotional quotient सोबत spiritual quotient किती महत्त्वाचा आहे ते देखील त्यांनी यावेळी पटवून दिले. काम करताना करूणा, कौतुक आणि कृतज्ञता या गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला यशदेखील चांगलेच मिळेल.
भविष्यात व्यवसायात Artificial intelligence चा वापर वाढणार असल्याने सर्वांनी अपडेट होणं खूप गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं. कारण असं केलं नाही तर तुम्ही आऊटडेटेड व्हाल. पण जरी AI चा कितीही वापर झाला तरी त्याची तुलना human being सोबत नक्कीच होणार नाही. मशिन ट्रेन करण्यासाठी माणसांची गरज लागणारच असं ते ठामपणे म्हणाले.
थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जतमधील जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये दिनांक २४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून हजारो शिष्यमंडळी सहभागी होत आहेत. दररोज दोन पर्वात विविध उपक्रमांचे आयोजन या कार्यक्रमांर्तगत करण्यात येत आहेत. सकाळच्या पहिल्या पर्वात ज्ञानेश्वर माऊली प्रणित हरिपाठ, दिव्य अनुभूती देणारी मानसपूजा, गुरुपूजन, कृतज्ञता साधना अशा अनेक उपक्रमांचा समावेश होता. पहिल्या सत्रात जीवनविद्या मिशनचे कार्य आयुष्यभर निस्वार्थ कार्य करणाऱ्या शिष्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा हा पुरस्कार जेष्ठ नामधारक अरविंद पडवळ आणि विश्वस्त दिलीप महाजन यांना देण्यात आला.