अलिबाग दि.२८: रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात. त्यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांशी गांवामध्ये हिंदु-मुस्लिम बौध्द तसेच इतर धर्मीयांची मिश्रवस्ती असल्याने अधून मधून वैयक्तिक कारणांमुळे पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये हिंदु-मुस्लिम व्यक्तीमध्ये जातीय तणावाच्या घडना घडून दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे देखील हिंदु-मुस्लिम जातीय तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील विधानसभा निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडील दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या पत्रान्वये सर्व सार्वजनिक ठिकाणी आंदोलने, मोर्चा, धरणे आंदोलन करण्यास प्रतिबंध करण्याबाबत आदेश पारित केलेले होते.
      रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात अचानकपणे आंदोलने, मोर्चा, धरणे आंदोलने, उपोषणे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व परिस्थिती तसेच विधानसभा निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता लक्षात घेता, नमूद औद्योगिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित राहावी. तसेच सण उत्सव व राजकीय परिस्थिती आंदोलन/उपोषण व आत्मदहनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीकोनातून रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि.२७ नोव्हेंबर २०२४ रोजी ००.०१ वा. ते दि.११ डिसेंबर २०२४ रोजीचे २४.०० वाजेपर्यत या कालावधीकरीता मुंबई पोलीस अधिनियम प्रमाणे अपर जिल्हादंडाधिकारी संदेश शिर्के यांनी खालील कृत्ये करण्यास मनाई आदेश जारी केला.

      शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, बंदूका, सुरे काठया किंवा लाठ्या अगर शारिरीक दुखापत करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही तत्सम वस्तू बाळगणे. अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्ती, प्रेत, आकृत्या यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा देणे किंवा गाणे म्हणणे किंवा वाजविणे. सभ्यता अगर निती याविरुध्द असतील अशी जिल्हयाची शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पाडण्याचा संभव आहे अशी आवेशपूर्ण भाषणे किंवा हावभाव करणे किंवा सोंग करणे, चित्र, चिन्हे अगर कोणतीही तत्सम वस्तू, जिन्नस तयार करणे किंवा लोकांत प्रसार करणे.रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत पूर्व परवानगीशिवाय पाच अगर पाचाहून अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास किंवा मिरवणूकीस मनाई राहील.
तसेच सदर अधिसूचना वरिष्ठांच्या आदेशानुसार किंवा कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे, अशा शासकीय अधिकाऱ्यांना अशी हत्यारे योग्य रितीने बाळगण्यासाठी अगर ठेवून घेण्यासाठी लागू नाही. ही अधिसूचना खऱ्या प्रेत यात्रेसाठी, अंत्यविधीच्या जमावास अगर शासकीय समारंभासाठी लागू नाही. तथापि, सदर कालावधीत होणारे उत्सव, सभा, मिरवणूका इत्यादी कार्यक्रमास परवानगी देण्याचे अधिकार संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात येत आहेत. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांतता धोक्यात येणार नाही याची जबाबदारी आयोजकांवर राहील, या अटीवर परवानगी द्यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!