पनवेल दि.१६: लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता मिळालेल्या मतदानाचा सकारात्मक विचार करून आपण विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागूया. पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणमधून आमदार महेश बालदी निश्चित विजयी होतील, असा दावा मावळ लोकसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल येथे आज आपल्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना केला.
पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे, भाजप उत्तर रायगड अध्यक्ष अविनाश कोळी, भाजप ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उप जिल्हाप्रमुख परेश पाटील, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲड. प्रकाश बिनेदार, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेविक रमेश गुडेकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, भाजप, आरपीआय, मनसे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी बोलताना या निवडणुकीत आपण प्रामाणिक प्रयत्न केले, पण मतदारात गैरसमज निर्माण करून देण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाला. संविधान बदलणार म्हणून सांगितले. आता केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आले आहे. संविधानात कोणताही बदल होणार नाही हे लोकांना समजेल. यापूर्वी काम करताना काही चुका झाल्या असतील त्या सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीपूर्वी सकारात्मक विचार करून गावा-गावात जाऊन लोकांचे गैरसमज दूर करा. कोकण पदवीधर मतदार संघात निरंजन डावखरे यांना मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचा सत्कार यापेक्षा मोठा भव्य दिव्य व्हावा, अशी आपली इच्छा होती. देशात आपले सरकार आले आहे, मग आपल्यात उत्साह का नाही? गुपचुप का राहण्याचे काही कारण नाही उत्साहाने काम केले पाहिजे. आपण कोठे कमी पडलो याचा अभ्यास करायचा आणि संरक्षणात्मक भूमिका न घेता आक्रमक भूमिका घ्यायची आहे. इथले प्रश्न घेऊन लोकांच्यात जाऊ म्हणजे लोक आपल्याबरोबर येतील. स्टेजवर भाषण करण्यापेक्षा गावागावात जाऊन त्यांचे प्रश्न सोडवूया. विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ या असे सांगून त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या कार्याचे कौतुक केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, महायुतीतल्या सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ज्यांनी या निवडणुकीमध्ये आप्पांचा विजय साध्य करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली अशा सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन व मनापासून धन्यवाद. या देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने 2014 सालापासून या देशाच्या विकासासाठी काम केले त्याला देशातल्या जनतेने कौल दिला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार लागोपाठ तिसर्‍यांदा बहुमताने या ठिकाणी सत्तेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांचेसुद्धा आपण मनापासून अभिनंदन करूया. या मतदारसंघाचे खासदार म्हणून आप्पांनी गेल्या दहा वर्षांमध्ये सातत्याने या मतदार संघाचे विषय हेरी संसदेमध्ये लोकसभेमध्ये मांडलेले आहेत. आप्पांनी नवी मुंबई विमानतळ नामांतराचा प्रश्न, सिडकोतील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न, विमानतळामुळे येणारे प्रकल्प व त्यावर आधारित प्रशिक्षण येथील प्रकल्पग्रस्तांना देणे, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राकडून मिळणारा निधी, पनवेल रेल्वे स्टेशनच्या प्रश्नांकडे खासदार श्रीरंग बारणे यांनी लक्ष वेधले आहे.
आमदार महेश बालदी यांनी सांगितले की, आप्पा आपल्या या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत केली आणि आम्ही जो शब्द दिला होता तो पाळला. तुम्ही तिसर्‍यांदा खासदार झालात सर्वप्रथम मनःपूर्वक तुमचा अभिनंदन. आप्पा उरण आणि पनवेलला आपण केंद्राकडून भरपूर आणले आहे. त्यामुळेच आपण विधानसभेला मोठ्या मताधिक्याने आपणच निवडून येणार अशी खात्री व्यक्त केली.
या वेळी कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांनी बोलताना महायुतीला लोकसभेला जरी अपेक्षित यश भेटले नाही तरीही महायुतीचा कार्यकर्ता हा कुठेही खचला नाही. ताकतीने सातत्याने लढण्याची भूमिका ठेवत. प्रत्येक निवडणूक येत्या काळामध्ये आपल्याला ताकतीने लढायची आहे. या पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली आणि त्याच अनुषंगाने येणार्‍या 26 तारखेला आपली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. पाच जिल्ह्यांचा हा मतदार संघ ठाणे जिल्हा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर म्हणजे चांदा ते बांदा असा हा मतदार संघ आहे आणि या मतदारसंघांमध्ये प्रत्येक मतदान हा आपल्याला मतदानासाठी नेण्याची यंत्रणा ही सातत्याने पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकीच्या माध्यमांनी आपण लावत चाललोय. आपण अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन केले आहे. येत्या 26 तारखेला मतदार काढण्याच्या संदर्भातली विनंती करतोय. सर्व मतदारांपर्यंत संदेश जाणे गरजेचे आहे.
मतदान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ईव्हीएमची मशीन येते आणि त्याच्यामुळे मतदाराच्या लक्षात येत असते की आपल्याला बटन दाबून मतदान करायचेय तर त्याला सांगायचे की यावेळेस बॅलेट पेपर आहे. 26 तारखेला पाऊसही भरपूर असेल आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला आपल्या मतदारांपर्यंत पोहाचवून त्याचे मतदान निश्चित करायचे आहे. मतदानाचे नियोजन आणि वेळ हे ठरवून आपण सगळ्यांनी या पद्धतीचे नियोजन 26 तारखेला करावे, अशी विनंती निरंजन डावखरे यांनी केली.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!