पनवेल,दि.15 : पनवेल महानगरपालिकेच्या 10 शाळांमध्ये पहिल्या दिवशी 1 ली ते7 वीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प,चौकलेट देऊन औक्षण करून ,ढोल ताशांच्या गजरात आज जोरदार स्वागत करण्यात आले. याचबरोबर विद्यार्थ्यांची लेझिम, ढोल ताशाच्या गजरात त्या त्या विभागात शालेय दिंडी काढण्यात आली.तसेच सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी लोकनेते दि.बा. पाटील शाळेमध्ये महापालिका शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण व किर्ती महाजन यांनी पाठ्य पुस्तक, गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच इतर नऊ शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. सर्व विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी यावेळी खास सेल्फी पाँईट तयार करण्यात आला.याठिकाणी विद्यार्थ्यांनी, पालकांनी सेल्फी काढल्या.
तसेच आज दहा शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा क्र.2 चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता पडताळणी करण्याच्या दृष्टीने शाळांमध्ये शारीरिक विकास, गणिती क्रिया, सामाजिक व भाषिक विकास अशा सात प्रकारचे स्टॉल मांडण्यात आले होते. या सातही स्टॉलवरती मुलांना हसत खेळत चित्रांच्या माध्यमातून ,खेळण्यांच्या माध्यमातून प्रश्नोत्तरे विचारून मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर या नवीन विदयार्थ्याचे औक्षण करून पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या स्वागताने सर्व मुले भारावून गेली होती.