पनवेल दि. 9: खारघरमध्ये बुधवारी (दि. 8) संध्याकाळपर्यंत कोरोनाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर ही अनेक नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. राज्यात कोरोना विषाणू (कोविड-19) रोखण्यासाठी साथ रोग अधिनियम कायदा 1897 लागू करण्यात आलेला आहे. त्या अधिकाराचा वापर करून महापालिका आयुक्तांनी खारघरमधील घरकुल सेक्टर 15 कंटेन्मेंट झोन म्हणजेच ‘बाधित क्षेत्र’ म्हणून जाहीर केले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 17 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून खारघर सेक्टर 15 मधील घरकुल सोसायटीत तीन रुग्ण सापडले असून हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. या परिसरात राहणार्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यास तसेच बाहेरून येणार्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंधित करण्यात आले आहे.