रत्नागिरी दि.१० (सुनिल नलावडे) नैसर्गिक आपत्तीपाठोपाठ कोरोनामुळे उध्वस्त झालेल्या आंबा शेतकऱ्याला पाठबळ मिळावे म्हणून भाजपा नेते निलेश राणे यांनी आंबा शेतकऱयांसाठी शासनाकडे 50 टक्के अनुदानाची मागणी केली होती. त्याप्रमाणे केंद्र सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून 50 टक्के अनुदानासह राज्य शासनाने हमी भावाने आंबा खरेदी करून विक्री करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिह तोमर यांनी दिला आहे.
कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी ज्यावेळी राज्यातील लॉक डाऊनमध्ये मालवाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच खराब हवामानात अडकलेल्या आंबा शेतकऱ्यांचा तयार झालेला माल बागायतीमध्ये तसाच पडून असल्याचे भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी कोकणातील जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. हा आंबा नाशिवंत माल असलेने बाजारपेठेत पोहोचणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र आंब्यासह अन्य फळ उत्पादन बाजारपेठेमध्ये पोहोचू शकले नाही. ज्या ठिकाणी बाजारपेठेत आंबा व कोकणातील उत्पादन झालेली अन्य फळे जातात त्या ठिकाणी हा उत्पादन झालेला माल उतरवून घेण्यास तेथील व्यापाऱ्यांनी नकार दिला. या सर्व प्रकरणात वेळेत माल न पोहोचल्याने आंबा शेतकऱ्यांना मोठया अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
मुळातच हवामानाच्या बिघडलेल्या चक्रात आंबा शेतकरी अडकलेला असताना यावर्षी उत्पादन जेमतेम होत होते. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पाऊस राहिल्याने आधीच आंबा पीक संकटात आले, आणि त्यातच आता कोरोनाच्या संकटामुळे आंबा बागायतदारांचे कंबरडे मोडणार आहे. यावर्षी आंबा पिकाचे मोठ्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यातून आंबा व्यावसायिक अडचणीत आला आहे. याबाबत अनेक आंबा व्यावसायिकांच्या व्यथा भाजपा नेते निलेश राणे यांनी शासनाकडे मांडल्या व पाठपुरावा लावून धरला. आंबा उत्पादकांनी देखील निलेश राणे यांनी केलेल्या 50 टक्के अनुदान मीळण्याची मागणी शासनाकडे लावून धरली.
अखेर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिह तोमर यांनी कोकणातील विशेषत: रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून शेतकऱ्यांना गरजेचे असलेले 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषिमंत्री श्री. तोमर यांच्यासह भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.