पनवेल, दि.26 (संजय कदम) : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत महत्त्वपूर्ण कारवाई करत 26 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल 56 कोटी 69 लाख 55 हजार 192 रुपये किंमतीचे अंमली पदार्थ नष्ट केले.
‘नशा मुक्त नवी मुंबई’ अभियानांतर्गत अंमली पदार्थांविरोधात सातत्यपूर्ण, समन्वयित आणि कठोर कारवाई सुरू असून, आतापर्यंत 166 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत सुमारे 57 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या अभियानाच्या पुढील टप्प्यात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून समाजातील व्यसनाधीनतेला आळा घालण्याच्या उद्देशाने जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ शासनमान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी, तळोजा (ता. पनवेल, जि. रायगड) येथे कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून नष्ट करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे तसेच पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) सचिन गुंजाळ उपस्थित होते. अंमली पदार्थांविरोधातील लढा अधिक प्रभावी करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत ‘नशा मुक्त नवी मुंबई’ अभियानांतर्गत मागील दोन दिवसांत शहरातील शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी व्यापक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. सुमारे 25 शाळा व महाविद्यालयांतील 5 हजार विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय अंमली पदार्थांबाबत नागरिकांकडून माहिती मिळावी यासाठी 88281-112-112 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. नागरिक या क्रमांकावर गोपनीय स्वरूपात माहिती देऊ शकतात. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याची ग्वाही पोलीस प्रशासनाने दिली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून भविष्यातही अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र, कायदेशीर आणि समन्वयात्मक पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार असून नागरिकांनी निर्भयपणे आणि गोपनीयतेने माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133