कळंबोली दि.३१: कळंबोली येथे कामोठे ,नौपाडा ,रोडपाली, ओवे, खारघर येथील जमा केलेला सर्व कचरा स्थलांतरण करण्यासाठी कळंबोलीतील भूखंडाची निवड करण्यात आली आहे. कळंबोली मध्ये जमा केल्या जाणाऱ्या कचरा संकलन करून मग स्थलांतरण केंद्रातून डम्पिंग ग्राउंड वर त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. मात्र कळंबोली मध्ये जमा होणाऱ्या कचरा स्थलांतरण केंद्रातून कळंबोलीतील आजूबाजूच्या परिसरातील व कळंबोली करांच्या आरोग्याला कोणतीही हानी व बाधा न होता तसेच कळंबोलीत कचरा स्थलांतरणांमुळे प्रदूषण न होण्याची दक्षता घेण्याची मागणी कळंबोलीतील श्री रवीनाथ चरू पाटील सामाजिक चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रवीनाथ पाटील यांनी एका पत्रानुसार पनवेल महापालिकेकडे केली आहे.
कळंबोलीतील रोडपाली गावाजवळील तलावा लगत असलेल्या मल निसारण केंद्रातील मोठा भूखंड हा कचरा स्थलांतरण केंद्रासाठी पनवेल महापालिकेने निश्चित केलेला आहे. १४८५ चौरस मीटर च्या भूखंडावर तब्बल १४ कोटी २४ लाख रुपये खर्च करून कचरा स्थलांतरण केंद्र निर्माण केले जाणार आहे. या स्थलांतरण केंद्रामध्ये दररोज दोनशे टन कचरा चे स्थलांतरण करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा येथे पाठवला जाणार आहे. सदरच्या कचरा स्थलांतरण केंद्राच्या आजूबाजूस गृहनिर्माण संस्था असून नागरी वस्ती ही आहे. दररोज साठणाऱ्या कचऱ्यातून सुटणारी दुर्गंधी त्यातून होणारे प्रदूषण याची दक्षता घेण्याची मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. कळंबोली येथील रवीनाथ पाटील सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत पनवेल महापालिकेचे आयुक्तांना लेखी पत्र देऊन स्थलांतरणासाठी जमा केला जाणाऱ्या कचऱ्यातून कोणतेही प्रदूषण व नागरी वस्तीला हानिकारक असे आरोग्याशी निगडित प्रश्न निर्माण होऊ नये याबाबतची दक्षता व काळजी घेण्याची मागणी एका लेखी पत्रानुसार केली आहे.