पनवेल दि.१९ : अलिबाग तालुक्यातील जवळपास ३५०० कुटुंबे मोठ्या संख्येने पनवेल नवी मुंबई या परिसरात कायमचे वास्तव्य करून आहेत. पनवेल मधील अलिबाग मधील समाज बांधव हा एकत्रित यावा, एकमेकांच्या विचारांचे आदान प्रदान व्हावे व अलिबाग मधील समाज बांधवांना हक्काचे कायमस्वरूपी एखाद्या सभागृह असावे यासाठी अलिबाग मधील रहिवाशी मोठ्या दिमतीने सरसावले आहेत. पनवेलमध्ये दहा गुंठ्याचा भूखंड घेऊन त्यावर अलिबाग भवन उभारावे ही संकल्पना मांडण्यात आली .ही संकल्पना सत्यात उतरावी यासाठी अलिबाग भवना करता लागणारा मोठा निधी संकलित करण्यासाठी विविध उपाय योजना आयोजित केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पनवेल मधील फडके नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ नाटकाचा प्रयोग आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमास पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर ,अलिबागचे आमदार महेंद्र दळवी ,संघाचे अध्यक्ष आल्हाद पाटील, कार्याध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष महेंद्र वावेकर, सचिव एन जी पाटील, खजिनदार विवेक बाजी, भालचंद्र पाटील, अनंता भोपी, ॲड.शेळके, ऍड. तेलंगे, अविनाश पाटील, राकेश पाटील, सुहास पाटील, अलका कोळी- तोडणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अलिबाग ही क्रांतीची आणि संस्कृतीची भूमी आहे. या भूमीतून अलिबाग कर जेथे प्रवेश करतात ते तिथे यशस्वी होतात . निरूपण कार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या निरूपणाची महती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे.अलिबाग मधील चरीचा संप हा ऐतिहासिक आहे. अलिबाग मधील रहिवासी पनवेल मध्ये स्थिरावून ते पनवेल कर झालेले आहेत. त्यांनी ठरवलेलं अलिबाग भवन हे निश्चितच साकारणार असून त्यासाठी मी माझ्या परीने सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे ठोस आश्वासन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी दिले.
या नाटकाच्या तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न हे अलिबाग भवनासाठी वापरले जाणार आहे. अलिबाग भावनासाठी मोठ्या संख्येने अलिबाग मधील रहिवाशी नागरिक तन-मन-धन अर्पण करून पुढे सरसावले आहेत. आपल्या हक्कासाठी आपल्या हक्काचे एखादे सभागृह अलिबाग भवन पनवेलला येणाऱ्या नागरिकांना राहण्याची उत्तम सोय व्हावी, सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न समारंभ व अन्य कार्यक्रम करता यासाठी सुसज्ज असे सभागृह असावे अशी संकल्पना या अलिबाग भवन मधून साकारण्यात येणार असल्याचे आल्हाद पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद म्हात्रे यांनी केले.