पनवेल,दि.12 : पनवेल बस स्थानकाजवळील धोकादायक अवस्थेत असलेल्या जाहीरत फलकांवरती महानगरपालिकेच्यावतीने नुकतीच निष्कासित कारवाई करण्यात आली.
घाटकोपर येथील होर्डींग दुर्घटनेनंतर पनवेल महानगरपालिका अॅक्शन मोडवर आली आहे. महापालिकेने महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागामधील 33 अनधिकृत जाहिरत फलकापैकी 21 अनधिकृत जाहिरत फलकांवर निष्कासित करण्यात आले आहेत. शनिवारी आयुक्तांनी घेतलेल्या विभागवार आढावा बैठकिमध्ये उर्वरित होर्डिग्जचा ‘क्विक सर्वे’ करून त्यामधील अत्यंत धोकादायक होर्डिग्ज निष्कासित करण्याच्या सूचना दिल्या होत्या..
आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानूसार पनवेलमधील बस आगार आणि हॉटेल दत्त इन जवळील जाहिरत फलक गेले काही दिवस गंजलेल्या अवस्थेत होते. अंदाजे 40 फूट उंच असलेले हे जाहिरत फलक धोकादायक बनले होते. हा परिसर अत्यंत गर्दीचा परिसर आहे. बस आगारातून रोज हजारो नागरिकांची ये-जा असते. परंतु याठिकाणी काही तांत्रिक अडचणींमुळे कारवाई करता येत नव्हती. उपआयुक्त मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक अडचणींवर मात करत अखेर हे जाहिरत फलक नेस्तनाबूत करण्यात आले. यावेळी महापालिकेचे प्रभाग अधिकारी रोशन माळी, क्षेत्रीय अभियंता संकेत कोचे, तुषार कामतेकर आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
यापुढे महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत जाहीरत फलकांवर महापालिका लक्ष ठेवून असणार आहे. मनपा क्षेत्रात अनधिकृत जाहिरत फलक आढळल्यास महापालिकेच्यावतीने कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.