माथेरान दि.११: (मुकुंद रांजाणे) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पाऊलखुणा लागलेल्या रायगड जिल्ह्यातील माथेरान या टुमदार पर्यटनस्थळासाठी आजवरच्या कार्यकाळात करोडोंचा निधी उपलब्ध झाला होता. याच निधीच्या माध्यमातून हे नयनरम्य पर्यटनस्थळ विकसनशील होणे अपेक्षित होते. परंतु आलेल्या निधीचा सदुपयोग न केल्यामुळेच आजही केलेली बहुतांश कामे अत्यंत निकृष्ट झालेली आहेत तर काही कामे अल्पावधीतच उपयोगाविना पडून आहेत. खूपच कमी क्षेत्र असलेल्या या ठिकाणी नियोजन पद्धतीने जर का विकासकामे मार्गी लावली असती तर काहीअंशी का होईना हे स्थळ आणखीन बहारदार झाले असते. काही वर्षांपूर्वी जवळपास १२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता यामध्ये नेरळ माथेरान घाटरस्ता,माथेरानचा मुख्य रस्ता आणि महत्वाच्या पॉईंट्सच्या सुशोभीकरणासाठी खर्च करण्यात आला होता. मुख्यत्वे जी काही लोकाभिमुख पर्यटकांना सेवासुविधा निर्माण करणारी कामे होती त्याकडे नगरपरिषदेच्या माध्यमातून करडी नजर ठेवून सर्व कामे उत्तम दर्जाची करून घेणे अपेक्षित होते परंतु संबंधित अधिकारी वर्गाने ठेकेदाराच्या आणि स्वतःच्या फायद्यासाठी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्यामुळे बहुतांश कामे तकलादू झालेली आहेत.
एमएमआरडीए च्या माध्यमातून गावातील एकूण सात ठिकाणी वस्ती स्वच्छता गृहे उभारण्यात आली होती. त्यामध्ये सुध्दा निविदे प्रमाणे कामे न केल्यामुळे या वास्तूचा लाभ घेताना येथील अस्वच्छतेमुळे नागरिकांना खूपच त्रासदायक ठरत आहे. पर्यटकांसाठी एक नाविन्यपूर्ण आकाशगंगा प्रकल्प उभयारण्यात आला होता तो सुध्दा सुरुवातीला काही दिवस दिखावा म्हणून पर्यटकांना आकाशातील ग्रह तारे दाखविले गेले. थोडीफार माहिती देण्यात येत होती त्यानंतर हा प्रकल्प मागील पाच ते सहा वर्षांपासून बंद आहे त्यासाठी वापरण्यात आलेली यंत्रे धूळखात पडून आहेत एकंदरीत या वास्तूसाठी लाखो रुपयांचे अकारण नुकसान झालेले आहे. पावसाळ्यात महत्त्वाच्या भागात मातीची धूप होऊ नये यासाठी धूप प्रतिबंधक जाळ्या बसविण्यात आल्या होत्या त्या जाळ्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळे ह्या कामावर सुध्दा लाखो रुपये खर्च करण्यात आले होते ते गंगाजळीत गेले आहेत.
घनकचरा व्यवस्थापन कामासाठी दरवर्षी कोटी रुपये खर्च केले जातात परंतु स्वच्छतेच्या नावाने नेहमीच बोंबा असतात. त्यावेळी गावातील काही होतकरू युवक दरवेळेस स्वच्छता मोहीम हातात घेऊन महत्वाच्या ठिकाणी डोंगर दर्यात जाऊन सुका कचरा,प्लास्टिक बाटल्यासह अन्य प्लास्टिक कचरा गोळा करत असतात. काही ठिकाणी मोबाईल टॉयलेट उभारली आहेत ती नियमितपणे स्वच्छ ठेवली जात नसल्याने पर्यटकांना विशेषतः महिला पर्यटकांना खूपच त्रासदायक ठरत आहे. नगरपरिषदेचे कंपाऊंड ,प्राथमिक शाळा त्याचप्रमाणे हुतात्मा स्मारक येथे बांधण्यात आलेल्या जांभ्या दगडातील भिंतीला लावण्यात आलेल्या तारेच्या संरक्षक जाळ्या निखळून पडल्या आहेत.शाळेच्या प्रांगणाजवळ असलेले लोखंडी गेट सुध्दा उन्मळून पडले आहे त्यामुळे याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देणाऱ्या नगरपरिषदेच्या दवाखान्यात दानशूर व्यक्तींनी दिलेले लाखो रुपये किंमतीचे साहित्य धूळ खात पडून आहे. काही शासकीय इमारतीच्या नूतनिकरणासाठी निविदेत नमूद केल्याप्रमाणे सागवानी लाकूड वापरण्यात आलेले नसून त्याजागी बाभूळच्या लाकडांचा वापर करण्यात आलेला आहे. मुख्य रस्त्यासाठी लागणारे क्ले पेव्हर ब्लॉक हे उत्तम दर्जाचे आहेत की नाही याची शहानिशा न करता कामांचा सपाटा सुरू ठेवल्यामुळे काही ठिकाणी कच्च्या ब्लॉक मुळे रस्त्यांना खड्डे पडले आहेत. यावरून रहदारी करताना येथील वाहतुकीच्या साधनांना तसेच पायी चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांना खूपच जिकिरीचे बनले आहे. अशाप्रकारे अनेक ठिकाणी तकलादू कामे केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठीच आणि स्वतःच्या लाभासाठी पूर्ण केली असल्याने शासनाच्या करोडो रुपयांचा चुराडा झालेला दिसून येत आहे. याबाबत स्थानिक मंडळी नेहमीच चर्चा करत आहेत की कुठे नेऊन ठेवले आहे माथेरानला….
निदान यापुढे तरी शासनाच्या निधीचा सदुपयोग करून या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सुज्ञ लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत असे सूर ऐकावयास मिळत आहेत.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!