पनवेल दि.१६ (संजय कदम) : रिक्षातून प्रवास करताना हरवलेली ११ लाख ५० हजार रुपये किमतीची मौल्यवान ऐवज असलेली बॅग पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या दहा तासांत शोधून काढली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेत बॅगेतील सर्व ऐवज सुरक्षित हस्तगत केला. त्यानंतर हा मुद्देमाल संबंधित महिलेला परत करण्यात आला.
पेण येथील अर्चना अरुण जाधव (६१) या पनवेल रेल्वे स्थानक ते बसस्थानक असा रिक्षाने प्रवास करीत होत्या. यावेळी त्यांची पांढऱ्या व निळ्या पट्ट्यांची ‘जगदंबा’ नावाची बॅग रिक्षात राहिल्याने गहाळ झाली. या बॅगेत पाच तोळ्यांचे सोन्याचे गंठण, अडीच तोळ्यांची दोनपदरी सोन्याची माळ, एक लाख १८ हजार रुपये रोख आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण ११ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज होता. याबाबत त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रारीची दखल घेत पोलिसांनी रेल्वे स्थानक ते पळस्पे फाटा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली. तांत्रिक तपासातून संबंधित रिक्षाचालक राजू गणपत सावंत (६३) यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यांनी बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली. चौकशीत रेल्वे स्थानकाबाहेरील सर्कलजवळ पुढील रिक्षातून बॅग पडल्याचे दिसल्याने ती आपल्याकडे घेतल्याचे सावंत यांनी सांगितले. बॅग पोलीस ठाण्यात जमा करण्याचा त्यांचा विचार होता; मात्र कौटुंबिक कारणे आणि वैयक्तिक कामांमुळे त्यांना पोलीस ठाण्यात जाता आले नाही.
पोलिसांनी सर्व ऐवजासह बॅग अर्चना जाधव यांच्या स्वाधीन केली. हरवलेला लाखोंचा ऐवज सुरक्षित परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार, पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण, पोलीस शिपाई सचिन कोर, अभिजित गडकरी, महिला पोलीस शिपाई तेजू भगत आणि सुशीला सवार यांनी केली. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अल्पावधीत बॅग शोधून काढल्याबद्दल पनवेल शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.
