उमेदवारीचा फार्म भरणे, प्रचार, आचारसंहीता, मतमोजणी आणि मंत्रीमंडळ प्रक्रिया
पनवेल,दि.२२: देशातील निवडणूक प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच जागरूकता निर्माण करण्यासाठी दिनांक २० जुलै रोजी महानगरपालिकेच्या पोदी शाळा, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेमध्ये आंतरशालेय निवडणुक घेण्यात आली.
विद्यार्थ्यांना लोकशाहीमधील मतदानाचे महत्त्व व त्या अनुषंगाने येणारी सर्व आदी प्रक्रिया समजावून घेण्यासाठी महापालिकेच्या पोदी शाळा, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेमध्ये आंतरशालेय निवडणुक घेण्यात आली. यावेळी रितसर उमेदवारांचे फार्म भरण्यात आले. इयत्ता ३रीच्या मुलांनी ७वी च्या वर्गामध्ये जाऊन प्रचार केला, 2 दिवस आधी आचारसंहीता लागू करण्यात आली. नंतर अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया घेण्यात आली. मतदान झाल्यावर एका तासाने मतमोजणी करण्यात आली. निवडून आलेल्या उमेदवारांचे ढोल ताशा च्या गजरात स्वागत करण्यात आले. यामध्ये शाळेच्या अनुषंगाने निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचे मंत्री मंडळ तयार करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय मंत्री, क्रीडा मंत्री, सहल मंत्री, अभ्यास मंत्री, परिपाठ मंत्री, पर्यावरण मंत्री, सहल मंत्री, शालेय शिस्त मंत्री, आरोग्य मंत्री अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे मंत्रीमंडळ तयार करण्यात आले.मंत्रीमंडळाला कामाची जबाबदारी समजून सांगण्यात आली. अशा प्रकारे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवून त्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, अधिक्षक किर्ती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात आंतरशालेय निवडणूक घेण्यात आली.