पनवेल दि.12: कोरोनाची भयंकर परिस्थिती पाहता राज्यातील जनतेला विश्वासात घेऊन नियोजन आणि निर्णय घेण्याची गरज असतानाही ठाकरे सरकार स्वतःच्या बचावासाठी राज्यातील जनतेची फसवणूक करीत आहे, अशी घणाघाती टीका माजी खासदार भाजपनेते किरीट सौमय्या यांनी आज येथे केली.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संदर्भात लोकांच्या सोयीसुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून किरीट सौमय्या यांनी नवीन पनवेल आरोग्य केंद्र. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय, डॉ. पटवर्धन रुग्णालय तसेच आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन आढावा घेतला. त्यानंतर मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला.  त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या निष्क्रिय कारभाराचे वाभाडे काढीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील परिस्थिती माहिती आहे कि नाही ? असा सवालही उपस्थित केला. 
या पत्रकार परिषदेस भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, सहकार सेलचे उत्तर रायगड संयोजक कुंडलिक काटकर आदी उपस्थित होते. 

सचिन वाझेच्या लेटर बॉम्बमध्ये अनिल परब यांचा उल्लेख आहे, पोलीस भरती घोटाळा, आरटीओ घोटाळा असे अनेक घोटाळे समोर येत आहे, असे नमूद करून आज सायंकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तर उद्या दिल्लीला सीआयडी यांची भेट घेऊन या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे किरीट सौमय्या यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच हा सचिन वाझे प्रकरण किमान दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा त्यांनी करीत एनआयए, सीआयडी, ईडी, इन्कम टॅक्स आदी विभागाच्या माध्यमातून त्याचा तपासा सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले. पनवेल परिसरातील रुग्णालयाला भेट देऊन तेथील वैद्यकीय तज्ज्ञांशी संवाद साधत रुग्णांच्या योग्य उपचारांसंदर्भात चर्चा केली, असल्याचे त्यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तराला देताना सांगितले. 

     आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आणखी ऑक्सिजन प्लांट प्रकल्प कार्यान्वित केल्याचे मागील वर्षीच सांगितले मग ऑक्सिजनचा पुरवठा नसल्याने अनेक रुग्णांच्या जीवाशी या सरकारने का खेळ केला? असा सवाल करून  कोविड दुसऱ्या टप्प्यात असताना उद्धव ठाकरे आणि त्यांची सहकारी मंडळी सचिन वाझे प्रकरणात स्वतःला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. एका बेडवर तीन-चार रुग्ण, खुर्चीत रुग्ण, व्हरांड्यात रुग्ण हि परिस्थिती राज्य सरकारच्या अपयशी कारभारामुळे सर्वसामान्य जनतेवर आली असल्याचे त्यांनी अधोरेखित करून मुंबई महापालिका व ठाकरे सरकारची मोठी लबाडी सुरु आहे, असेही त्यांनी म्हंटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्राने महाराष्ट्राला ०१ कोटी लसीचे डोस दिले तर येत्या ३० दिवसात आणखी ०१ कोटी डोस राज्याला मिळणार आहेत, रेडीसीमेवर इंजेक्शन,  लसींचे नियोजन करण्याचे काम राज्य सरकारचे आहे. मात्र लोकांचा विचार न करता राजकारण करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केल्याचेही त्यांनी म्हंटले. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड्स, उपचार, याबाबतीत तर राज्य सरकारने विचार केला नाही त्यामुळे राज्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली तसेच अंतिम संस्कारासाठी २४ ते ४८ तास लागत आहे, याला जबाबदार कोण तर राज्य सरकारच आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी ठाकरे महाविकास आघाडी सरकारवर चढवला.   

      कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या वाहनांची जप्ती झाली पुढे काय? असा यावेळी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना किरीट सोमय्या यांनी, कर्नाळा बँक घोटाळ्याला ठाकरे सरकारने संरक्षण दिले आहे, असे अधोरेखित करून कर्नाळा बँक घोटाळ्याचा मागोवा घेत आम्ही सातत्याने गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत मात्र हे राज्य सरकार घोटाळ्याबाजांवर कोणतीही कारवाई करीत नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

       यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना, कोरोना काळात भाजपच्यावतीने सर्वसामान्यांचा विचार आणि सूचनांचा विचार करून त्यांना आवश्यक मदत करण्याचे काम केल्याचे नमूद केले. मागील वेळी सुद्धा माजी खासदार किरीट सौमय्या यांनी एमजीएम कामोठे रुग्णालय, इंडिया बुल विलगीकरण केंद्राला भेट देऊन आढावा घेतला होता त्याच धर्तीवर त्यांनी आज आरोग्य केंद्र, रुग्णालयांना भेट देऊन डॉक्टरांशी तसेच आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी चर्चा करत रुग्णांची योग्य उपचाराची काळजी घेण्याची सूचना केली, असल्याचे सांगितले. सध्या दरदिवशी ५०० हुन अधिक कोरोना रुग्ण पनवेल परिसरात आढळत आहे, त्यामुळे जम्बो कोविड सेंटरची आवश्यकता लक्षात घेऊन तशी मागणी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!