चंद्र-मंगळ पिधान युती व दोन वेळा सुपरमून दिसणार !
मुंबई दि.१३: आजपासून प्लवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४३ चा प्रारंभ होत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा हा हिंदू मराठी कालगणनेप्रमाणे नवीन वर्षातील पहिला दिवस, गुढीपाडवा घरोघरी गुढी उभारून तिचे पूजन करून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त असतो.या नूतन वर्षात काय घडणार आहे याची माहिती पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
प्लवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४३ हे नूतन वर्ष मंगळवार १३ एप्रिल २०२१ पासून १ एप्रिल २०२२ पर्यंत आहे. या नूतन संवत्सराचे नाव ‘प्लव‘ असे आहे. प्लव या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे होडी,नौका असा आहे.
या नूतन संवत्सरामध्ये ही नौका संकटांची नदी पार करण्यास मदत करील असा विश्वास वाटतो असे दा. कृ. सोमण म्हणाले.
या नूतन वर्षात दोन चंद्रग्रहणे व दोन सूर्यग्रहणे होणार आहेत परंतू आपल्या इथून एकही ग्रहण दिसणार नाही. २६ मे रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण ईशान्य भारतातून दिसेल. १० जूनचे कंकणाकृती सूर्यग्रहण, १९ नोव्हेंबरचे खंडग्रास चंद्रग्रहण आणि ४ डिसेंबरचे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. परंतू शनिवार, १७ एप्रिल रोजी चंद्र-मंगळ पिधान युती भारतातून दिसणार आहे. सूर्यप्रकाशामुळे मंगळ ग्रह चंद्रबिंबाआड जाताना दिसणार नाही. परंतू रात्री ७ वाजून २१ मिनिटांनी मंगळ चंद्रबिंबामागून बाहेर पडतांना आपणास दिसणार आहे. त्या दिवशी पश्चिम आकाशात हे दृश्य पाहता येईल. या नूतन वर्षात दोनदा सुपरमून दिसणार आहेत. मंगळवार, २७ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या रात्री आणि बुधवार, २६ मे रोजी वैशाख पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे आपणास सुपरमून दिसणार आहे. सुपरमूनच्यावेळी चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त तेजस्वी दिसते.
या नूतन वर्षात ३० सप्टेंबर, २८ आक्टोबर आणि २५ नोव्हेंबर असे तीन गुरुपुष्य योग येणार आहेत. गणेशभक्तांसाठी २७ जुलै व २३ नोव्हेंबर रोजी अशा दोन अंगारकी चतुर्थी येणार आहेत. तसेच या नूतन वर्षात श्रावण, भाद्रपद , आश्विन हे तीन महिने वगळता इतर नऊ महिन्यात विवाह मुहूर्त आहेत. या नूतन वर्षी गुरुवार ४ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याने दिवाळीचा प्रकाशाचा उत्सव एक दिवसाने कमी असणार आहे. या नूतन वर्षातील पर्जन्य नक्षत्रे व वाहने पाहता पाऊस चांगला पडणार असल्याचे दा, कृ. सोमण यांनी सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!