अलिबाग,दि.5 :- अँड्रॉइड मोबाईल येण्याआधीचे शालेय जीवन खूपच सुंदर होते. परंतु काळ जसा बदलत आहे त्याप्रमाणे शैक्षणिक व्यवस्थाही बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे एज्युकेशनल हब श्रीवर्धनमध्ये उभारण्याचा आपला संकल्प आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे केले.
श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे शिक्षक दिनानिमित्त “तेजस्विनी पुरस्कार” व “सरस्वती भूषण पुरस्कार” वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत हाेत्या.
यावेळी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, जिल्हा परिषद सदस्य प्रगती अदावडे, सरपंच परविन नाझ, पंचायत समिती सदस्य मंगेश काेमनाक, प्रांताधिकारी अमित शेडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव पवार, तहसिलदार सचिन गोसावी, प्राचार्य श्रीनिवास जोशी, गटविकास अधिकारी श्री.सिनारे, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, सिध्दू कोसंबे, गणेश पाेवेकर, दर्शन विचारे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, मला या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले पण याच सोहळ्यात मलाच तेजस्विनी पुरस्काराने गौरविण्यात आले, हा मला सुखद धक्का आहे.आपल्या हस्ते चांगल्या व्यक्तींचा सन्मान करता आला याचा अर्थ आपण योग्य मार्गाने जात आहोत याचे समाधान आहे. उच्चशिक्षितांनी राजकारणात यावे पण शैक्षणिक कार्यात मात्र राजकारण आणू नये.
बालपणीच्या शालेय आठवणी सांगताना शिक्षकांबरोबरच वडील,आजी आणि आई यांनी दिलेल्या संस्कारामुळेच आज आपण इथपर्यंत पोहोचल्याचे सांगून त्या म्हणाल्या की,यश गाठल्यानंतरही पाय जमिनीवर राहण्यासाठी जीवन प्रवास डोळ्यासमोर नेहमीच राहायला हवा. स्व.राऊत साहेब, स्व.अंतुले साहेब तसेच खासदार सुनिल तटकरे साहेबांनी श्रीवर्धनचे नाव त्यांच्या कार्यकर्तृत्वाने उंचाविले आहे. ते अधिकाधिक उंचावून शैक्षणिक क्षेत्राची प्रगती साधायची आहे.
पालकमंत्री तटकरे यांनी श्रीवर्धनचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्याचा संकल्प असल्याचे सांगून विविध सेवाभावी संस्था, राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व शासनाच्या वतीने येथील शैक्षणिक संस्थांना मदत करणार असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या अभ्यासासाठी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगून येथील विद्यार्थी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार तसेच विविध शासकीय उच्च पदांवर पाहायला मिळावेत,अशी अपेक्षा शेवटी व्यक्त केली.
या कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री आदिती तटकरे यांना प्राचार्य श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,मानपत्र व सन्मानचिन्हासह “तेजस्विनी पुरस्कार” देवून गौरविण्यात आले तर शिक्षकदिनानिमित्त उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांना “सरस्वती भूषण” या पुरस्काराने सुरेश मुद्राळे,आनंद जोशी,शब्बीर खतीब आणि नरहर बापट यांना पालकमंत्री तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या सोहळ्यात प्लॅटिनियम व कोकणरत्न या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य श्रीनिवास जोशी यांनी निसर्ग चक्रीवादळात विद्यालयाचे नुकसान झाले होते, तेव्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांना संपर्क करताच त्यांनी तात्काळ पाच लाख रूपयांची मदत केल्याचे आवर्जून सांगितले. उपप्राचार्य निलेश चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.