पनवेल, दि.3 (संजय कदम) प्रत्येक व्यक्तीने मॉलमध्ये खरेदीसाठी येताना स्वतःची काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, हात सॅनिटायझ करावेत, मॉलने दिलेल्या नियम व अटींचे पालन करून खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आज कोरोना योद्धा डॉ.गिरीश गुणे यांनी पनवेल शहरातील नामांकित असे ओरियन मॉलच्या रि-ओपनिंगच्या वेळी केले.
यावेळी कोरोना योद्धा डॉ.गिरीश गुणे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागनाथ यमपल्ले, ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, मानसी परुळेकर, मनन परुळेकर, धवल दोडिया आदी उपस्थित होते. शासनाने व पनवेल महानगरपालिकेने मॉल पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिल्यावर आज शहरातील नामांकित डॉ.गिरीश गुणे व वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागनाथ यमपल्ले यांच्या हस्ते ओरियन मॉलचे रि-ओपनिंग करण्यात आले. यावेळी बोलताना गिरीश गुणे यांनी सांगितले की, पनवेल परिसरात रुग्ण हे कमी जास्त प्रमाणात आढळून येत असून आजही आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे. व आगामी काळात या रोगाला प्रतिकार करण्यासाठी सर्वांनी योग्य खबरदारी घ्यावी, ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी आज धाडसाने मॉल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण 1400 कामगारांचे भवितव्य व त्यांचे पोटपाणी या मॉलवर अवलंबून आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे त्यांनी सांगितले. तर वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागनाथ यमपल्ले यांनी सुद्धा आज सहा महिन्यानंतर प्रथमच एका कार्यक्रमासाठी बाहेर पडल्याने पनवेलकरांचे आभार त्यांनी मानत कोरोनाशी दोन हात करताना पनवेलकर सतर्क आहेत व योग्य ती काळजी घेत आहेत. रुग्ण कमी जास्त होत आहेत. परंतु आपल्याला लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार घ्यावेत म्हणजे आपण लवकर या रोगातून मुक्त होवू. या रोगामुळे घेत असलेल्या खबरदारीने इतर आजार सुद्धा कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी या दोन्ही कोविड योद्धांच्या कामगिरीचे कौतुक करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या दोन्ही योद्धांनी रुग्ण सेवा केली आहे. त्यांचे त्यांनी कौतुक केले. व आजपासून सर्व पनवेलकर व इतर परिसरातील नागरिकांसाठी ओरियन मॉल खुला झाल्याचे त्यांनी सांगितले.