‘व्हॅलेंटाइन्स डे’ निम्मित प्रेमी युगल गीतांचा नजराणा ‘अभी ना जाओ छोडकर..’
पनवेल दि.१२: कुणीही कितीही नावे ठेवली वा नाके मुरडली तरी चित्रपटसृष्टी असो वा नाट्यक्षेत्र, दूरदर्शनचं मालिका जगत असो वा संगीतविश्व.. 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाइन्स डे’ साजरा करणारच ! अवघ्या जगाला प्रेमाचा संदेश देणारा ‘व्हॅलेंटाइन्स डे’ भारतीयांसाठी आणखी एका कारणासाठी विशेष आहे ते म्हणजे तमाम भारतीयांच्या लाडक्या मधुबालाचाही वाढदिवस. याचंच औचित्य साधून ‘द डिव्हाइन म्युझिक अनलिमिटेड’ जुन्या हिंदी गीतांच्या चाहत्यांसाठी घेऊन येत आहे ‘अभी ना जाओ छोडकर..’ हा युगलगीतांचा अर्थात प्रेमगीतांचा एक विशेष कार्यक्रम. युगलगीत हा भारतीय चित्रपटसंगीताचा एक महत्वाचा पैलू आणि अविभाज्य घटक. जसा गाण्यांशिवाय हिंदी चित्रपटांचा विचारही करता येत नाही तसंच किमान एका तरी युगलगीताशिवाय हिंदी चित्रपट पूर्णच होत नाही. हॉलीवूडच्या चित्रपटातील युगलगीतांची संख्या काही शेकड्यात असेल तर हिंदी चित्रपटातील युगलगीतांची संख्या काही हजारात. यावरुनच युगलगीतांची भारतातली लोकप्रियता लक्षात येते. अशा या लोकप्रिय गीतप्रकाराच्या कार्यक्रमात तब्बल दहा गायक-गायिका हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगातील निवडक 26 गाणी लाइव्ह वाद्यवृंदासह सादर करतील. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. 14 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 वा पनवेल येथील फडके नाट्यगृहात सादर केला जात आहे.
‘डिव्हाइन म्युझिक’चे वार्षिक सभासदत्व रसिकांसाठी उपलब्ध असून आसनव्यवस्थेनुसार सभासद शुल्क आकारण्यात येते. यात रसिक तीन कार्यक्रमांचा लाभ घेऊ शकतात. 14 फेब्रुवारीच्या ‘अभी ना जाओ छोडकर..’ व्यतिरिक्त मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात होणार्या ‘द लीजंडस्’ या कार्यक्रमात रसिकांना 1950 ते 1980 या तीन दशकातील 25 नामवंत संगीतकारांची प्रत्येकी एक अशी 25 सर्वोत्कृष्ट गीते ऐकायला मिळतील. मदन मोहन यांचा स्मृतिदिन आणि रोशन यांच्या जन्मदिनानिमित्त 13 जुलै रोजी सादर केल्या जाणार्या ‘रहें ना रहें हम..’ या तिसर्या कार्यक्रमात या दोन महान संगीतकारांच्या सर्वोत्कृष्ट 25 गीतांचा श्रोत्यांना आनंद घेता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : जयंत टिळक : 98194 05245 अथवा डॉ. मनोज रणदिवे : 91672 12012.