मंडळांनी 30 ऑगस्ट पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन.
अलिबाग,दि.29: राज्य शासनाने दि. 31 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरिता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे.
असे आहेत पुरस्कार
राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये 5 लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख 50 हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये 1लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास 25 हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 ऑगस्ट 2022 हा आहे. याबाबत दिनांक 26 ऑगस्ट 2022 पासून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सहभागासाठी अटी
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. स्थानिक पोलिस स्थानक अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

विहित नमुन्यातील अर्ज इथे उपलब्ध
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर what is new या शीर्षकावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विहित नमुन्यातील अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेल वर दिनांक 30 ऑगस्ट 2022 पर्यंत दाखल करता येतील. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल, अशी माहिती पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दिली.

असे आहेत निकष
मूर्ती पर्यावरणपूरक असावी. सजावट पर्यावरणपूरक म्हणजेच यात थर्माकोल, प्लॅस्टीक आदी साहित्य असू नये. गणेश मंडळाचे वातावरण ध्वनी प्रदूषणरहित असावे. पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा, इत्यादी समाज प्रबोधन विषयावर देखावा / सजावट असावी. स्वातंत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावा / सजावट याला अधिक गुण दिले जाणार आहेत. रक्तदान शिबीर, वैद्यकीय सेवा शिबिर, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादी बाबत केलेल्या कार्याचे मूल्यमापन होईल. महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादी बाबत मंडळाचे कार्य असावे. पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम / स्पर्धा, पारंपारिक / देशी खेळाच्या स्पर्धा याचबरोबर गणेशभक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा यात पाणी, प्रसाधनगृहे, वैद्यकीय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतुकीस अडथळा येणार नाही, असे नियोजन, आयोजनातील शिस्त या बाबी प्राधान्याने गुण देताना विचारात घेतल्या जाणार आहेत. अर्ज करताना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

अशी आहे जिल्हास्तरीय समिती
वर नमूद केलेल्या बाबींची जे गणेश मंडळ पूर्तता उत्कृष्टपणे करतील, त्यांना गुणांकन देऊन विजेत्याची निवड करण्याकरिता जिल्हास्तरीय समितीची रचना पुढीलप्रमाणे आहे:-
जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतील. शासकीय / शासनमान्य कला महाविद्यालयाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, संबंधित जिल्ह्यातील पोलीस अधिकारी या समितीचे सदस्य राहतील. ही समिती गणेशोत्सव उत्सव स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक ती माहिती, व्हिडिओ, कागदपत्र मंडळाकडून प्राप्त करून घेतील व दिनांक 13 सप्टेंबर पर्यंत मंडळांना दिलेले गुणांकन राज्य समितीला सादर करतील.
राज्यस्तर समितीची रचना करण्यात आली असून यात सर जे.जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता / वरिष्ठ प्राध्यापक, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातील वरिष्ठ गट-अ मधील अधिकारी यांचा समावेश आहे.
राज्यस्तर समिती ही जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येकी एक याप्रमाणे 36 शिफारस प्राप्त गणेशोत्सव मंडळामधून गुणांकनाच्या अधारे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांची निवड करतील.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!