पनवेल दि.३१: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने (दि. २९ ऑगस्ट) मुंबईत सदिच्छा भेट घेऊन आभार मानले.
नवी मुंबईच्या विकासात असलेले लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान आणि स्थानिकांच्या विविध संघटनांची मागणी विचारात घेता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास जुलैमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान नामकरणाचा ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आला. लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी सर्वपक्षीय कृती समितीने व्यापक लढा उभारून आंदोलने केली. त्यास ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला होता ते सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे व संघटनांचे अध्यक्ष आणि हा ठराव मांडण्यासाठी पुढाकार घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा सर्वांचे लेखी पत्र देऊन समितीकडून आभार मानण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, जे. डी. तांडेल, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, गुलाब वझे, पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, माजी नगरसेविका विद्या गायकवाड, विजय गायकर आदी समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेत आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे अधिवेशनात मंजूर ठरावाला केंद्र सरकारने मंजुरी देऊन नामकरणावर शिक्कामोर्तब करावे यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती यावेळी करण्यात आली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!