पनवेलदि.२३: महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींचे आकर्षण असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील ‘रामबाग’ या सुंदर उद्यानाचा तृतीय वर्धापन दिन सोहळा हजारों नागरिकांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात सोमवारी सायंकाळी साजरा झाला.
नयनरम्य वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून युवक, महिला, ज्येष्ठांची उपस्थितीने रामबाग नंदनवन प्रमाणे फुलले होते. आणि त्यातच पारंपरिक आगरी-कोळीगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने वातावरणात स्फूर्ती आणली होती. स्वतःच्या संपत्तीतून लोकांच्या सेवेसाठी उभारलेली ‘रामबाग’ ही वास्तू न्हावे पंचक्रोशीतीलच नव्हे तर पनवेल, उरण, रायगड नवी मुंबई आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या गौरवाची ठरली आहे, विशेष म्हणजे ‘रामबाग’ आता पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले आहे. थोर दानशूर व्यक्तिमत्व आणि सर्व समाजाचे आधारस्तंभ असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त न्हावे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि म्हसेश्वर मंदिर समिती आणि रामबाग व्यवस्थापन कमिटीच्यावतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हृदय सत्कार करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला.
या सोहळ्याला खासदार धैयशील पाटील, माजी मंत्री व विद्यमान आमदार रवीशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी शहराध्यक्ष अनिल भगत, सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर ठाकूर, श्री. म्हसेश्वर मंदिर कमिटी अध्यक्ष सि. एल. ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.
वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री. सत्यनारायण महापूजेचे हजारो नागरिकांनी दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पप्पू सूर्यराव, स्टेप आर्ट इंटरटेन्मेन्ट निर्मित व सनी संते प्रस्तुत ‘हिच खरी आगरी कोळ्यांची दौलत’ या पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने आणखी रंगत आणली होती. रामबागला भेट देणाऱ्यांना समाधान आणि त्यांच्या चेहऱ्यावर मनमुराद आनंद दिसतो. रामबागच्या रूपाने या परिसराला आणखी एक चांगली ओळख मिळाली. राज्यातून विविध भागातील लोकं या ठिकाणी आवर्जून भेट देत आहेत. अनेक उद्यानांना प्रवेश फी आकारली जाते मात्र रामबागेत प्रवेश विनाशुल्क आहे. या ठिकाणी प्रवेश मोफत असले तरी सुविधा मात्र दर्जेदार आहेत. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी अशी ‘स्वर्गसुख आनंद देणारी रामबाग’ म्हणून ओळखली जात आहे. दुबईतील ‘मिरॅकल गार्डन’ च्या धर्तीवर १४ एकर जागेत उभारलेल्या या ‘रामबाग’ उद्यानात भव्य आणि सुरेख प्रवेशद्वार, निसर्गरम्य हिरवळीसह विविध प्रकारच्या फुलझाडांच्या असंख्य विविध रचना, तलाव, विद्युत रोषणाई, पदपथ, चिरेबंदी बांधकाम, आसन व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे, डबल हर्ट आणि स्टोन सेल्फी पॉंईंट, मचवा, पाण्याचे कारंजे, अशा सर्व बाबी आकर्षक आणि मनमोहक आहेत. सायकांळी या उद्यानाचे रूप बदलते, त्यावेळी असणारी विद्युत रोषणाई अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटणारी आहे. त्यामुळे राज्यातील निसर्गप्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देत आहेत. ती संख्या तीन वर्षात लाखोंच्या पलीकडे गेली आहे. कौटुंबिक, तसेच विविध कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवाणीमुळे निसर्गाचा आस्वाद या ठिकाणी घेता येत आहे. तसेच विद्यमान व पुढील पिढीला सुंदर वास्तू आणि मोकळ्या हवेत आणण्याचे काम या निमित्ताने झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला रामबागच्या रूपाने हि एक चांगली पर्यटन वास्तू मिळाल्यामुळे या विभागाचे नाव मोठे झाले आहे.‘रामबाग’ हे उद्यान सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आदर्श व प्रेरणादायी सार्वजनिक उद्यान म्हणून नावारूपास आले आहे. आबालवृद्धांना आपलेसे वाटणारे हे उद्यान कोणतेही प्रवेश शुल्क न आकारता सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात मनःशांती मिळवण्याबरोबरच येथे आरोग्यदायी चालण्यासाठी योग्य मार्ग, मुलांसाठी आकर्षक खेळाची साधने तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी शांत, सुरक्षित आणि निवांत वातावरण उपलब्ध आहे. त्यामुळे ‘रामबाग’ हे उद्यान नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. सामाजिक सलोखा आणि आरोग्यसंवर्धन यांचा सुरेख संगम येथे अनुभवायला मिळत असून, हे उद्यान सामाजिक बांधिलकीचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!