प्रशांत ठाकूर विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज आहेत फक्त त्यांना मताधिक्य द्यायचे आहे – प्रथमेश सोमण
पनवेल दि.९: पनवेल परिसरात आलेल्या विविध प्रकल्पांमुळे आता पुढच्या पिढीला पनवेलमध्येच रोजगार मिळणार आहे, असे प्रतिपादन महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे केले.
शिवसेनेचे महानगरप्रमुख ऍड. प्रथमेश सोमण व पदाधिकारांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत शिवसेना प्रणित शिवप्रेरणा श्रमिक कामगार संघटना आणि एकता चालक मालक संघटनेने महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
या बैठकीस शिवसेनेचे महानगरप्रमुख ऍड. प्रथमेश सोमण, उपमहानगर प्रमुख महेश सावंत, शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, विभागप्रमुख किरण पवार, प्रसिद्धी प्रमुख तौफिक बागवान, उपशहर प्रमुख मच्छिंद्र झगडे, शिवप्रेरणा श्रमिक कामगार संघटना अनिल गागडा, अनिल धोत्रे, प्रदीप इंदवटकर, रमेश बैद, भगवान पाटील, बाळू मंजुळे, एकता चालक मालक संघटनेचे शशिकांत सावंत, अझमत डोलारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले कि, पनवेल परिसरात विमानतळ, मेट्रो, आणि त्या अनुषंगाने याठिकाणी नागरीकरण आणि त्यांना सेवा सुविधा वाढणार आहेत त्याचबरोबरीने तळोजात ८० हजार कोटी रुपयांचा सेमी कंडक्टर प्रकल्प येणार आहे त्यामुळे या ठिकाणी रोजगाराची मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार असून भावी पिढीला रोजगार, नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही, पनवेलमध्येच हि संधी मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बांधले होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या तडफेने काम केले ती तडफ कायम राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला असल्याचे नमूद केले. ते पुढे म्हणाले कि, सरकारच्या योजना सर्वाना मिळाल्याच पाहिजे यासाठी आपण नेहमी आग्रही राहिलो आहे, त्यामुळे पुढील काळातही त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणारे सरकार अर्थात महायुतीचे सरकार असणे गरजेचे आहे त्यामुळे सर्व नागरिकांची साथ मला ताकद देणार असून तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन, असा विश्वास या बैठकीच्या अनुषंगाने त्यांनी पनवेलच्या जनतेला दिला.
यावेळी ऍड. प्रथमेश सोमण यांनी म्हंटले कि, आमदार प्रशांत ठाकूर यांनी कधीही राजकारण केले नाही. कुठल्याही पक्षाचा किंवा संघटनेचा व्यक्ती असो त्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचे काम त्यांनी केले आहे. पक्ष संघटना म्हणून आम्ही त्यावेळी विरोधी पक्षात असतानाही त्यांनी कधीच राजकारण केले नाही. कामगार आणि रिक्षा चालकांच्या हितासाठी त्यांनी नेहमीच सहकार्य केले. रिक्षा चालकांमध्ये काही जण फूट पडतात पण ते आपण होऊ द्यायचे नाही. असे सांगतानाच विरोधक हिंदू मुस्लिम असा राजकरण करतील पण विरोधकांच्या भूलथापांना आणि अप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी कामगार आणि रिक्षा चालकांना केले. आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज आहेत फक्त त्यांना मताधिक्य द्यायचे आहे, असेही सोमण यांनी स्पष्ट केले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!