पनवेल, दि.20 (संजय कदम) मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळील बोर्ले टोल नाक्याजवळ अपघात झालेल्या गाडीला मदत करण्यासाठी धावून गेलेल्या दोघांवर काळाने घाला घातल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. यामध्ये मदतीसाठी धावून गेलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती हे पनवेलमधील रहिवासी आहेत. तर यांच्या सोबत मदतीसाठी असलेले दोघेजण जखमी झाले असून त्याच्यावर अष्टविनायक हॉस्पिटल व एमजीएम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर मुंबईच्या दिशेने जाणार्या एका स्विफ्ट कारला कंटेनरने मागून धडक दिली होती. त्यामध्ये स्विफ्ट कारचा मागून चक्काचूर झाला होता. याच दरम्यान या परिसरात असलेले सुशांत मोहिते, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिळे व इतर दोघेजण त्या अपघातात मदत करण्यासाठी आपली मर्सिडीज गाडी घेऊन थांबले आणि कारमधून उतरून अपघातग्रस्ताला मदत करण्यासाठी स्विफ्ट कारच्या दिशेने जाणार त्याचवेळी मर्सिडीज कारच्या मागून आलेल्या आयशर टेम्पोने मर्सिडीजला धडक दिली. मात्र ही धडक एवढी भयानक होती की, या धडकेत पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते (27) आणि त्याचा मित्र प्रथमेश बहिरा (वय 30) यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्यासोबत असलेले मित्र हर्षद खुदकर हे जखमी झाले असून यावेळी अपघातग्रस्त स्वीफ्ट गाडीमधील शरिफ अक्तर (41 रा.पुणे) हे सुद्धा जखमी झाले होते. तर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिळे हे सुखरूप आहेत. यावेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पथक, आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलिस यंत्रणा-पळस्पे, देवदूत, लोकमान्य हॉस्पिटलचे कर्मचारी, डेल्टा फोर्स यांनी मदतीला धाव घेतली होती.