पनवेल दि.२२: देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शहिद भगत सिंग,शहिद राजगुरु व शहिद सुखदेव ह्यांनी आपली आहुती देऊन ९० वर्षांपूर्वी भारतच्या इतिहासात आपले नाव अजरामर केले. ब्रिटिश राजवटीच्या गुलामगिरीचा अंत करण्यासाठी आपले बलिदान देणाऱ्या या महान हुतात्म्यांच्या स्मरणार्थ २३ मार्च २०२१ रोजी हा देश पुन्हा एक इतिहास निर्माण करणार आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद देखील ह्या इतिहासाचे साक्षीदार होणार आहेत. नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट अँड अँक्टिव्हिस्ट्स व महाराष्ट्र आंट्रपूनर चेंबर ह्यांच्या संयुक्त विद्यमणाने संवेदना मोहिमे अंतर्गत या दिवशी देशभरात १५०० हून अधिक रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून सुमारे दीड लाख रक्त युनिट दान भारत देशाला करुन शहिदांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचे हे मुख्य शिबीर पनवेल येथील सी.के.टी महाविद्यालयात मंगळवार दिनांक २३ मार्च २०२१ रोजी आयोजित केले आहे.
या मोहिमेस महाराष्ट्र शासन व राज्यातील एस बी टी आय,टाटा कॅन्सर रिसर्च,इंडियन फार्मासिट्युकल असोसिएशन, धन्वंतरी आरोग्य सेवा संस्था, बी.बी परफॉरमिंग आर्ट्स, सप्तरंग, जोंधळे सेवाभावी संस्था, नाना पालकर स्मृती समिती अश्या अनेक संस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे.रक्तदान करा, व्यसन नको. तरुणांना हा निरोप देऊन, देशाला स्वेच्छा रक्तदान क्षेत्रात स्वावलंबी करण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र राज्यातील तरुणही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यासंदर्भात संवेदना महाराष्ट्र राज्य प्रकल्प संचालक अमेय पाटील यांनी म्हंटले आहे कि, रक्तदानाच्या या मोहिमे मध्ये फक्त भारत देशच नव्हे तर परदेशात वास्तव्य करणारे अनिवासी भारतीयही सामील झाले आहेत आणि सर्वांच्या सक्रिय सहभागाने ही मोहीम अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. प्रत्येक रक्तदात्याने दान केलेले एक युनिट रक्त, चार लोकांचे जीव वाचवू शकते. संपूर्ण देशाला या विषयावर जागरूक करण्यासाठी देशभरातील १००० हून अधिक संस्था संवेदना अभियाना अंतर्गत जनजागृती मोहीम राबिवित आहेत. या मोहिमेनंतर राष्ट्रीय स्तरावर एक सॉफ्टवेअर आणि मोबाइल अॅप देखील सुरू करण्यात येणार आहे, ज्यात देशभरातील रक्तदात्यांची माहिती असेल. देशाच्या कोणत्याही भागात जेव्हा रक्त आवश्यक असेल तेव्हा त्याची गरज त्या रक्तगटाच्या रक्तदात्यांमार्फत पूर्ण जाणार असून हि मोहीम अत्यंत महत्वाची असल्याचेही या अनुषंगाने नमूद केले आहे.