पनवेल दि.२२: भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज पनवेल येथील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कोविड – १९ अर्थात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.
यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. बसवराज लोहारे, आरोग्य अधिकारी गोसावी आदी उपस्थित होते.
मागील वर्षात संपूर्ण जगात कोविड १९ अर्थात कोरोना या वैश्विक महामारीने थैमान घातले. या महामारीने संपूर्ण जगात परिस्थिती गंभीर केली. रोजंदारीवर जीवन असलेल्या अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन जाण्याबरोबरच दोन वेळचे अन्न मिळणे कठिण झाले होते. कोरोना व्हायरस आणि त्यामुळे आलेल्या लॉक डाऊन परिस्थितीत गरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दानशूर नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भाजपच्यावतीने ‘मोदी भोजन’ कम्युनिटी किचन अर्थात मोफत अन्नछत्र उपलब्ध करून दिले आणि त्यामार्फत १ लाख ५० हजारहून नागरिकांना भोजन देण्यात आले. त्याचबरोबर १ लाख १० हजारहून अधिक नागरिकांना कोरडा अन्नधान्य देऊन कोरोनाच्या संकटकाळात आधार देण्यात आला. १ लाखाहून अधिक नागरिकांना मास्क व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबीर, परगावी जाण्यासाठी सुविधा अशी अनेक प्रकारची मदत आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. त्यांनी या काळात केलेली मदत खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना आधार आणि समाजात प्रेरणा देणारी ठरली असून सतत सामाजिक बांधिलकी जपणारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.
