०२ एप्रिलला पनवेल विभागात सावरकर गौरव यात्रा
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती
पनवेल दि.२९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे, त्यानुसार ०२ एप्रिलला पनवेल परिसरात हि गौरव यात्रा होणार असल्याची माहिती भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. राज्यभरात ३० मार्च पासून यात्रेला प्रारंभ होणार असून ही यात्रा ६ एप्रिल पर्यंत चालणार आहे. आणि या यात्रेतून नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, प्रथमेश सोमण, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रवक्ते प्रकाश बिनेदार, रायगड जिल्हा विस्तारक अविनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, माजी खारघर शहर भाजपचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा वर्षा नाईक, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, सुहासिनी केकाणे, सपना पाटील, अंजली इनामदार आदी पदाधिकाऱ्यांसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे माहिती देताना सांगितले कि, राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघातून सावरकर गौरव यात्रा प्रवास करणार आहे. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा – शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्या अनुषंगाने रविवार दिनांक ०२ एप्रिल रोजी पनवेल परिसरात हि गौरव यात्रा होणार असून खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, पनवेल या भागात हि यात्रा गौरव रथाचा सहभाग घेऊन होणार आहे.