केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे होणार भुमिपूजन
पनवेल दि.२८: गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा भुमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक ३० मार्च रोजी सकाळी ०८ वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे होणार आहे. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण, राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती असणार आहे.
या महामार्गातील काही टप्प्यामध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि दरवर्षी डांबरीकरणावर होणारा कोट्यवधींचा खर्च टाळण्यासाठी काँक्रीटीकरणाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी करून त्यांनी तातडीने निधी मंजूर केला. त्या अनुषंगाने मुंबई ते गोवा महामार्गावरील पनवेल ते कासु सेक्शन मधील ४२. ३० किलोमीटर अंतर रस्त्याचे काँक्रीटीकरण (खर्च २५१. ९६ कोटी रुपये), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डीडी राजेवाडी फाटा ते वरंध गाव या १३ किलोमीटर लांबीतील रस्त्याचे कॉक्रीटीकरणासह दुपदरीकरण करणे (खर्च १२६. ७३ कोटी रुपये), तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डीडी वरील वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द या ८.६० किलोमीटर लांबीतील रस्त्याचे काँक्रीटीकरणासह दुपदरीकरण करणे (खर्च ३५.९९ कोटी रुपये) अशा एकूण ६४ किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार असून यासाठी ४१४.६८ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. वाहनचालक आणि प्रवाशांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेल्या या समारंभाला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रवीशेठ पाटील, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी यांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!