पनवेल दि.21: पनवेल टाइम्सने पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज येथे केले. ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी संपादित साप्ताहिक पनवेल टाइम्स वर्तमानपत्राच्या १३ व्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  
        या वर्धापन दिन विशेषांकात, पत्रकारितेचा प्रवास, पनवेल टाइम्सची घौडदौड, सत्य बातम्यांचा मागोवा, सर्वस्पर्शी पत्रकारिता, डिजिटल पत्रकारिता आदी विषयांवरील लेखांचा समावेश आहे. या प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख, दैनिक वादळावाराचे संपादक ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, माजी शिक्षण संचालक रोहिदास पोटे, ज्येष्ठ पत्रकार रमेश भोळे, संजय कदम,सा. शिवसम्राटचे संपादक रत्नाकर पाटील, राजेंद्र पाटील, चंद्रकांत शिर्के, विशाल सावंत, असीम शेख, छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर, आदी पत्रकार उपस्थित होते. 
          लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे म्हंटले कि, गणेश कोळी गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रियतेने कार्यरत आहेत. सर्व समावेशक बातम्यांच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आधुनिकरणाच्या युगात सोशल मिडियामुळे ताबडतोब प्रसिद्धी होत असते मात्र गणेश कोळी यांच्यासारख्या पत्रकारांमुळे वर्तमानपत्रांचे महत्व अबाधित आहे, असे सांगतानाच गणेश कोळी यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. 
        यावेळी गणेश कोळी यांनी प्रास्ताविकात सांगितले कि, पनवेल, नवी मुंबईतून प्रकाशित होणारे वृत्तपत्र आहे. विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करीत आलो आहे, यापुढेही पत्रकारिता आत्मा मानून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!