पनवेल दि.२४: शहरासह ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास करणे हा उद्दिष्ट ठेवून लोकप्रतिनिधी व प्रशासन काम करीत आहे. नागरिकांना अभिप्रेत असलेला पनवेल महानगरपालिका हद्दीतील विकास अल्पावधीतच वेगवान ठरला आहे, त्यामुळे विकासाचा महामेरू कायम राहून पनवेल महानगरपालिका येत्या काळात राज्यातील उत्कृष्ट महानगरपालिका ठरेल, अशी खात्री महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी आज येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस उपमहापौर जगदिश गायकवाड, ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत, प्रकाश बिनेदार, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती सुशिला घरत, हेमलता म्हात्रे, अनिता पाटील उपस्थित होते. महापौर कविता चौतमोल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पुढे सांगितले कि, पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सातत्याने केले जात आहे. त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा विकासकामांचा झंझावात आज झालेल्या महापालिकेच्या महासभेत ३०५ कोटी रुपयांच्या विकासकामांना दिलेल्या मंजुरीवरून दिसून येत आहे. पनवेलचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असताना नागरिकांचा विकासही त्याचप्रमाणे झाला पाहिजे या दुरदृष्टीतुन नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतरित करण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून घेतला आणि मोठ्या प्रमाणात विकासाला चालना मिळाली. पनवेल महानगरपालिका हद्दीत अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प साकार होत असताना ग्रामीण भागातही स्मार्ट व्हिलेज योजना राबविण्यात येत आहे, त्यामुळे शहरांसोबत गावांचाही विकास साधला जात असल्याचे सांगतानाच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यातून आणि मार्गदर्शनातून विकासाचा आलेख उंचावत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
त्यांनी पुढे सांगितले कि, आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेत महापालिका हद्दीतील खारघर, कळंबोली व नवीन पनवेल या ठिकाणी ०६ प्ले ग्राऊंड, १५ उद्याने विकसित करण्यासाठी २७ कोटी २५ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली. हे सर्व विकसित करीत असताना या ठिकाणी सोयीसुविधांयुक्त प्ले ग्राऊंड व उद्याने मिळणार आहेत. त्यामध्ये युवकांना खेळण्यासाठी बॅडमिंटन, लॉन टेनिस, क्रिकेट, बास्केटबॉल, हॉलीबॉल, स्केटिंग, लहान मुलांसाठी किड्स प्ले (खेळांचे साहित्य), तसेच ज्येष्ठ नागरिकांनासाठी विरुंगळा केंद्र, वॉकिंग ट्रॅक, तसेच ओपन जिमचा समावेश असणार आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या सुलभ कामकाजाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी अशा अद्ययावत मुख्यालयाची आवश्यकता आहे त्याकरिता नवीन पनवेल (पश्चिम) येथील भूखंड क्रमांक ४ सेक्टर १६, क्षेत्रफळ २००८६ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड सिडको कडून प्राप्त झाला आहे या भूखंडाकरिता महापालिकेने २५ कोटी ५४ लाख ७२ हजार ७०१ रुपये सिडकोला अदा केले असून सदर भूखंड पनवेल महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच या करिता वास्तू विशारद सल्लागार म्हणून मी. हितेन सेठी यांची जाहीर स्पर्धात्मक निविदा मागवून सर्वात उत्कृष्ट व न्यूनतम दरास ०९ सप्टेंबर २०२० रोजी स्थायी समितीच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेची प्रस्तावित इमारत हि तळघर, तळमजला, सहा मजले व सहावा वरचा मजला, तसेच टेरेसवर आर्ट गॅलरी अशी एकूण २५४१५ .७६ एवढे क्षेत्र आहे. या भव्य अशा इमारतीस ढोबळ खर्च २८० कोटी रुपये अपेक्षित आहे. यापैकी सदर कामाच्या अंदाज पत्रकाच्या दृष्टीने व आर्थिक उपलब्धतेनुसार काम करण्याच्या दृष्टीने दोन टप्प्यांमध्ये निविदा मागविण्यात येणार आहे. त्याप्रमाणे प्रथम टप्प्यांमध्ये इमारतीच्या बांधकामाचा अंदाजित खर्च रक्कम १३७ कोटी रुपये आहे. दुसऱ्या टप्प्यात इंटीरियर वर्क, फर्निचर, लँड स्केपिंग, महासभागृहातील ऑडिओ व्हिज्युअल सिस्टीम व इतर सुविधा या बाबींचा अंदाजित खर्च १४३ कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रमाणे महासभेने प्रशासकीय व आर्थिक मान्यता दिली असून लवकरच पहिल्या टप्प्यातील निविदा प्रसिद्ध होणार आहे, असल्याचेही त्यांनी नमूद करत या प्रशासकीय इमारतीची उभारणी झाल्यानंतर राज्यातील एक आदर्श वास्तू म्हणून तिचा नावलौकिक होईल, असा विश्वासही महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी व्यक्त केला.