अलिबाग,दि.29 : माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदती संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे दि.11 डिसेंबर 2020 रोजीपासून आचारसंहिता अंमलात आली आहे.
नवी मुंबई पोलोस आयुक्तालय हद्दीत- परिमंडळ 2 मधील पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवाळे, वलप, वाकडी, वारदोली, उमरोली, हरिग्राम, वाजे, बारवाई, खानावळे, मोर्बे, खैरवाडी, खानाव, पालेबुद्रुक, साई, पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत- उसर्ली खूर्द, सांगुर्ली , देवळोली, नानोशी, कोळखे, खादेश्वर पोलीस ठाणे हद्दीत- आकुर्ली, पालीदेवद, न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीत- फुंडे गाव, उरण पोलीस ठाणे हद्दीत- चाणजे, नागाव, म्हातवली, वैश्वी, मोरासागरी पोलीस ठाणे हद्दीत- केगाव एकूण 27 ग्रामपचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून दि.15 जानेवारी 2021 रोजी मतदान व दि.18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी मतदान शांत, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणारत पार पडावे या उद्देशाने व नवी मुंबई आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रस्त्यावरून जाणाऱ्या जमावाचे अगर मिरवणुकीतील व्यक्तीचे वागणे अगर कृत्य याबाबत आदेश देणे, ज्या मागनि मिरवणूक किंवा जमाव जाईल अगर जाणार नाही ती वेळ व मार्ग निश्चित करणे, सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या ध्वनीक्षेपकाच्या ध्वनीची तीव्रता निश्चित करून दिलेली वेळ यावर नियंत्रण ठेवणे, मिरवणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा घेण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ याबाबत नियंत्रण करणे, याबाबतचे अधिकार देण्यासाठी परिमंडळ 2, पनवेल विभागात, पनवेल तालुका, पनवेल शहर, खांदेश्वर, उरण, न्हावाशेवा, मोरा सागरी या सर्व पोलीस ठाणे क्षेत्रातील जबाबदार अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 नुसार आदेशित केले आहे तसेच या क्षेत्रात दि.23 डिसेंबर 2020 च्या दुपारी 12 वाजल्यापासून ते दि.19 जानेवारी 2021 च्या रात्री 12.00 पर्यंत हे मनाई आदेश लागू केले आहेत.
या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम -1951, कलम 134 प्रमाणे कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असे नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी एका परिपत्रकाद्वारे कळविले आहे.