पनवेल दि.२८: स्थानिकांनी मागणी करूनसुद्धा टोलमध्ये सुट न दिल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज धडक मोर्चाचा दणका देत आयआरबी टोलनाका प्रशासनाला वठणीवर आणले. या दणक्याने टोलनाका प्रशासनाने ०१ जानेवारी २०२१ पासून टोलमध्ये सुट देण्याचे आश्वासन दिले आहे.
पनवेल तालुक्यातील किरवली येथे असलेल्या शिळफाटा टोलनाक्यातून स्थानिक ट्रान्स्पोर्टच्या छोट्या मोठ्या वाहनांना सूट दिली जात नसल्याने त्रिमूर्ती चालक मालक संघटनेच्या माध्यमातून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज किरवली(रोहींजण) टोलनाका प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाची तीव्रता पाहून पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात होता.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालीला धडक मोर्चाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व आंदोलकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून आभार व्यक्त केले.
या आंदोलनाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक हरीश केणी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, चाहुशेठ पाटील, गोपीनाथ पाटील, विनोद पाटील, रोहिदास पाटील, मोतीलाल कोळी, संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, उपाध्यक्ष राम पाटील, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या दरम्यान आयआरबी टोलनाका प्रशासनाकडून चर्चेसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाना आमंत्रित करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत टोल नाक्यावरून रोहींजण परिसरातील स्थानिक चालक मालक नोंदणीकृत संघटनेच्या सभासदांची माल वाहतूक वाहने विनाशुल्क वाहतूक करीत होती. परंतु सध्या संस्थेच्या वाहनांना टोल आकारले जात असल्याने त्यांना टोलमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या चर्चेदरम्यान केली अन्यथा तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचेही नमूद केले. यावेळी प्रशासनाने त्रिमूर्ती चालक मालक संघटनेच्या वाहनांना ०१ जानेवारी २०२१ पासून टोलमध्ये सूट देण्याचे मान्य केले. तसेच यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या टोलनाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात विषय मांडून त्यांना कमी पगारावर काम करावे लागत असल्याने त्यांना किमान वेतन १५ हजार रुपये पगार द्यावा, अशी मागणी यावेळी केली आहे.
