मुंबई दि.२८: येत्या शुक्रवार पासून सन २०२१ या नूतन वर्षाचा प्रारंभ होणार आहे. या नवीन वर्षांमध्ये आकाशात एकूण ४ चंद्र-सूर्य ग्रहणे होणार आहेत परंतू आपल्या इथून एकही ग्रहण दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.
सन २०२१ या नवीन वर्षात काय घडणार आहेया विषयी माहिती देतांना दा. कृ. सोमण म्हणाले की, बुधवार २६ मे रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण आपल्या इथून दिसणार नसून ते फक्त ईशान्य भारतातील जगन्नाथपुरी, भुवनेश्वर, कटक कोलकाता ,आसाम, मिझोराम, मेघालय, नागालॅंड, अरुणाचल येथून दिसणार आहे. तसेच या नूतन वर्षी गुरुवार १० जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण, शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आणि शनिवार ४ डिसेंबर रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. परंतू ही तीनही ग्रहणे भारतातून दिसणार नाहीत. त्यामुळे सन २०२१ हे नूतन वर्ष ‘ ग्रहणमुक्त ‘ आहे असे म्हणता येईल.
पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्याजवळ आला तर त्याला ‘ सूपरमून ‘ म्हणतात. अशावेळी चंद्र १४ टक्के मोठा व ३० टक्के जास्त तेजस्वी दिसतो. सन २०२१ मध्ये मंगळवार २७ एप्रिल आणि बुधवार २६ मे रोजी असे आकाशात दोनवेळा सुपरमून दिसणार आहे.
चंद्रबिंब जेव्हा एखाद्या ग्रह किंवा तारकेला झाकून टाकते त्याला ‘ पिधान युती ‘ म्हणतात. यावर्षी शनिवार १७ एप्रिल रोजी चंद्र- मंगळ पिधान युती दिसणार आहे. मंगळ चंद्राआड जाताना दिसणार नाही परंतू सायं. ७-२१ वाजता मंगळ ग्रह चंद्रबिंबामागून बाहेर पडताना दिसणार आहे. खगोलप्रेमींसाठी ही दुर्मिळ घटना पर्वणी ठरणार आहे.
या नूतन वर्षी दरवर्षींप्रमाणे ४ जानेवारी, २२ एप्रिल, ५ मे, २० जून, २८ जुलै, १२ ॲागस्ट, २२ ॲाक्टोबर,१७ नोव्हेंबर आणि १३ डिसेंबर रोजी रात्री आकाशातून उल्कावर्षाव होताना पहायला मिळणार आहे. सन २०२१ मध्ये १९ जानेवारी ते ११ फेब्रुवारी गुरू ग्रह आणि २१ फेब्रुवारी ते १६ एप्रिल शुक्र ग्रह सूर्यतेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाहीत.
सन २०२१ मध्ये २५ सुट्टयांपैकी २५ एप्रिल श्री महावीरजयंती आणि १५ ॲागस्ट स्वातंत्र्यदिन या दोनच सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. चाकरमान्यांना २३ सुट्ट्या मिळणार असल्याने सुट्टयांचीचंगळ होणार आहे. एप्रिल महिन्यात आलेल्या ५ सुट्ट्यांपैकी १३ एप्रिल गुढीपाडवा आणि १४ एप्रिल डॅा. आंबेडकर जयंती या दोन सुट्ट्या जोडून आल्या आहेत.
विवाहेच्छुकांसाठी आनंदाची बातमी मार्च, ॲागस्ट, सप्टेंबर, ॲाक्टोबर हे चार महिने वगळता इतर आठ महिन्यात भरपूर विवाह मुहूर्त आहेत. गणेशभक्तांसाठी २ मार्च,२७ जुलै आणि २३ नोव्हेंबर अशा तीन अंगारकी अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेल्या आहेत. सुवर्ण खरेदी करणारांसाठी २८ जानेवारी, २५ फेब्रुवारी,३० सप्टेंबर,२८ ॲाक्टोबर आणि २५ नोव्हेंबर असे ५ गुरुपुष्य योग आले आहेत.
सन २०२१ हे नूतन वर्ष लीपवर्ष नसल्याने या वर्षात कामे करायला फक्त ३६५ दिवसच मिळणार आहेत. तसेच सरत्या २०२० वर्षात ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता लीप सेकंद मोजला जाणार नसल्याने नूतन वर्षारंभ रात्री ठीक १२ वाजताच होणार आहे. मात्र पृथ्वीच्या गतीत होणार्या बदलामुळे सन २०२१ मध्ये ३० जूनला रात्री १२ वाजता लीप सेकंद मोजला जाण्याची शक्यता असल्याचेही पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!