पनवेल दि.27: भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेल पनवेल शहरतर्फे आयोजित मनोरंजन अनलॉक कार्यक्रम शनिवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाला.
कोरोनाच्या कठीण काळानंतर प्रथमच फडके नाट्यगृहात नाटक व संगीताच्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती.
या कार्यक्रमास महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी भाजप सांस्कृतिक सेलचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक शैलेश गोजमगुंडे, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, नगरसेवक संतोष भोईर, दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रूचिता लोंढे, शहराध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरिश मोकल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी चिन्मय समेळ, भाजप प्रदेश सांस्कृतिक सेल सदस्य राहुल वैद्य, सुनील सिन्हा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना तसेच नियोजन महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक सेलचे शहराध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सहसंयोजक गणेश जगताप तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरोनासंदर्भातील खबरदारी बाळगून करून कार्यक्रम यशस्वी केला.
यानिमित्त प्रसिद्ध संगीतकार व गायक अनिरुद्ध भिडे यांच्या ’सामगंध’ आणि गणेश भगत यांच्या पंचमनिर्मित ’गंध सुरांचा’ यांच्या संयुक्त विद्यमाने गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. अनिरुद्ध भिडे यांनी गीतरामायणातील निवडक गाणी सादर करून रसिकांची प्रशंसा प्राप्त केली. प्रणय पवार, संकेत गोविलकर, मयुरेश हिरे, भूपेंद्र पाटणकर, सिद्धेश शिंदे, श्रेयस केळकर, श्रावणी भिडे, स्वरदा भट, अपूर्वा भट, जुई महाजन, मानसी जगताप आदी कलाकारांनी नांदी, नाट्यगीत, भावगीत व भक्तिगीत गायन केले. देवेंद्र मराठे यांनी संवादिनी, गणेश घाणेकर, आदित्य उपाध्ये यांनी ढोलकी, तबला, प्रवीण भोपी यांनी ऑक्टोपॅड, तर राजू भोईर यांनी की बोर्ड साथ केली. अश्विनी भिडे यांनी अभ्यासपूर्ण निवेदन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यानंतर सीकेटी महाविद्यालयाचे विद्यार्थी व कलादर्पण यांच्या वतीने ‘बायकोच्या नवर्याच्या बायकोचा खून’ ही विनोदी एकांकिका सादर झाली.
