५० हजारांपेक्षा जास्त नागरिकांची असणार उपस्थिती; नियोजन बैठकीतून आढावा
पनवेल दि.४: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीला अटल सेतू शिवडी- न्हावा शेवा सी लिंक या महत्वकांक्षी प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमास ५० हजार पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार आहेत त्या अनुषंगाने उलवा नोड येथे राज्याचे सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन आढावा बैठक पार पडली.
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या बैठकीस माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश सरचिटणीस माधवीताई नाईक, माजी आमदार धैर्यशील पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, वाय. टी. देशमुख, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मोहपे, कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी महापौर कविता चौतमोल, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, खोपोली तालुकाध्यक्ष रमेश रेटरेकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा आश्विनी पाटील,पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे, ठाणे विभाग संघटन मंत्री हेमंत म्हात्रे, राजेश मपारा, मिलिंद पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, यांच्यासह पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.
उरण पनवेलमध्ये होणारे विकासात्मक टप्पे पाहता हे एक हब निर्माण होत आहे. नवी मुंबई विमानतळ आणि या सी-लिंकमुळे जगाशीही थेट संबंध या परिसराचा येणार आहे. त्याचबरोबरीने आता हा परिसर व मुंबई हाकेच्या अंतरावर आले आहे, त्याचा फायदा रायगड, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पालघर अशा सर्वच भागातील प्रवाशांसाठी होणार आहे तसेच या भागातील गावांचा झपाट्याने विकास होणार आहे. त्या अनुषंगाने हा प्रकल्प येथील लोकांसाठी महत्वपूर्ण असा आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि सभा नवी मुंबई विमानतळ परिसरातील भव्य मैदानावर होणार आहे. त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आत्मसात करण्यासाठी ५० हजार पेक्षा जास्त नागरिक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी नागरिकांची बैठक व्यवस्था, प्रवास, अल्पोहार, आदी व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हि नियोजन बैठक झाली. यावेळी नामदार रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना उपस्थितांना केल्या.