पनवेल दि.७: सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत अविरतपणे उल्लेखनीय कार्य करणारे आणि सर्व समाजाला प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. या वेळी सामाजिक, पत्रकारिता तसेच इतर क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्या कर्तृत्ववान महिला व पुरुषांचा सन्मान करण्यात आला. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग बारणे, झी चोवीस तास न्यूज चॅनलचे संपादक निलेश खरे, दै. महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक डॉ. दीपक दळवी, भारतीय पत्रकारचे संघाचे अध्यक्ष सुनील सोनवणे, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मंगेश नेने, अलबत्या गलबत्या या लोकप्रिय नाटकातील चिंची चेटकिणीची मध्यवर्ती भूमिका साकारणारे अभिनेते निलेश गोपनारायण, मिसेस इंडिया इंटरनॅशनल दुबई येथील विजेत्या डॉ. शुभदा जगदाळे यांची विशेष उपस्थिती होती. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे व सहकार्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
सोहळ्यास लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेेते वाय.टी.देशमुख, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीताताई पाटील, भाजप शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, महिला मोर्चा शहराध्यक्ष राजश्री वावेकर, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, सार्वजनिक जीवनात वावरताना जमेल तितके काम मी करीत असतो. आज माझ्या प्रेमाखातर आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे आभार. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने मला जीवनगौरव पुरस्कार मिळत असल्याने अतिशय आनंद आहे.
