पनवेल, दि.7 गेले दोन दिवस संततधार पाऊस पडत असल्याने पनवेल तालुक्यात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. तालुक्यातील आदई आणि कळंबोली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
पनवेल आणि परिसरात शनिवारपासून पावसाने आपली संततधार सुरु ठेवली आहे. शनिवार आणि रविवार विकेंड असल्याने अनेकांनी पावसाचा आनंद घेत आहेत. पनवेल शहरातील तालुका पोलीस ठाणे परिसर, मिडल क्लास सोसायटी, टपाल नाका, ठाणा नाका अशा सखल भागात पाणी साचतेच पण कधीही पाणी न साचणा-या लाईन आळी सारख्या ठिकाणी देखील पाणी साचून राहिले होते. कळंबोली वसाहत, कामोठे वसाहत या ठिकाणी तसेच आदई गावात मोठ्याप्रमाणात पाणी साचलेले पाहायला मिळाले. आदई येथे इमारती बांधण्यात येत आहेत. या इमारती बांधताना पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नियोजन केले गेले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. इमारतीच्या आवारात दोन फूट पाणी साचल्याने वाहन चालकांना त्याचा फटका बसला. सुटी असून नागरिकांना काळजीपोटी बाहेर पडता आले नाही. दरम्यान काहीनी मात्र विकेंड चांगलाच एन्जॉय केलेला पाहण्यास मिळाला. रविवारी रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कळंबोली वसाहत पूर्णतः जलमय झाली. वसाहती मधील साचलेले पाणी खेचण्यासाठी बसवण्यात आलेले सिंग हॉस्पिटल जवळील पंप हे रात्रभर बंद राहिल्याने पाणी कळंबोली वसाहतीत पूर्णता साचले. तीन ते साडेतीन फूट उंचीपर्यंत पाणी साचल्याने अनेकांच्या घरातही पाणी शिरले. एलआयजी भागातील नागरिकांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे घबराटीचे वातावरणही निर्माण झाले. रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या मोटरसायकल व चार चाकी वाहनही पाण्यात बुडाल्याने त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेकांनी आपल्या रिक्षा व दुचाकी सुरक्षित स्थळी नागरिकांना झालेल्या या त्रासाचे मात्र देणे घेणे ना सिडकोला ना महापालिकेला. नेहमीच येतो पावसाळा प्रमाणे दरवर्षीच मुसळधार पावसात कळंबोलीत पाणी साचते. पाणी साचू नये यासाठी कळंबोलीत २३ ठिकाणी पाणी खेचण्यासाठी मोटर पंप तैनात केले आहेत. मात्र सिंग हॉस्पिटल जवळील मोटर पंप हे सकाळपर्यंत बंद राहिल्याने पाण्याचा निचरा होऊ शकला नाही, अन त्याचा फटका कळंबोलीतील रहिवाशांना बसला. कळंबोलीतील सप्तशृंगी माता मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर, सेंट जोसेफ हायस्कूल परिसर, कार्मेल हायस्कूल, करांवली नाका ,सुधागड हायस्कूल, स्टेट बँक जवळील भाग हा सर्व जलमय झाला. त्यातच ऐन पावसाळ्यात नाल्यांच्या दुरुस्तीचे काम काढून ठेवल्याने नाल्यांकडे येणारे पाणी बंद झाल्याने त्याचाही फटका कळंबोली जलमय होण्यास कारणीभूत ठरला. भर पावसातही महापालिकेची नाले सफाई चे काम आजही सुरू आहे. त्यामुळे नालेसफाई कितपत झाली याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. केलेली नालेसफाई फोल ठरल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून ही तर नालेसफाई नसून तिजोरीची सफाई असल्याचा आक्रोश नागरिकांनी व्यक्त केला. दुपारी दीड वाजेपर्यंत कळंबोलीत साचलेल्या पाण्याचा निचरा झालेला नव्हता. यातच पावसाच्या रेट्याने कळंबोलीतील शिवसेना शाखेजवळ एक मोठे झाड उभ्या असलेल्या गाडीवर पडल्याने मोठे नुकसान झाले. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून कोसळलेले झाड त्वरित कापून बाजूला करून रस्ता मोकळा करून घेतला.