कारवाईसाठी वायूवेग पथकाची निर्मिती !
पनवेल दि.२८: मीटरप्रमाणे भाडे आकारण्यास टाळाटाळ करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. रिक्षा चालकांची मुजोरी वाढत असून भरमसाठ भाडे आकारणीमुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन पनवेल संघर्ष समितीने सोमवारी (दि.27) रोजी दुपारी 12 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालयात बैठक घेतली. त्यात 1फेब्रुवारीपासून रिक्षा मीटरवर चालण्यासाठी कायदेशीर सक्ती करताना, कारवाईकरिता वाहतूक खाते आणि प्रादेशिक परिवहन खात्याचे संयुक्तिक वायूवेग पथक तयार करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मणराव दराडे यांनी संघर्ष समितीला दिली. कळंबोली येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मणराव दराडे यांच्या दालनात दुपारी पनवेल संघर्ष समितीने उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसोबत रिक्षा मीटर भाड्याप्रमाणे सुरू करण्याबाबत महत्वपूर्ण बैठक घेतली. गेल्या अनेक वर्षापासून रिक्षा आणि सामान्य प्रवासी यांच्यातील शीतयुद्ध शमण्याची काही चिन्हे दिसत नव्हती. त्यात राज्य शासनाची सुरू असलेली परमिटची खैरात वादात आणखीच तेल टाकण्यास कारणीभूत ठरत आहे. रिक्षा चालकांवर अंकुश नसल्याने काही जण वाट्टेल तसे भाडे आकारून लूटमार करीत आहेत. जवळचे भाडे नाकारणे, प्रवासी नाकारणे, मीटरप्रमाणे भाडे न घेणे, प्रवाश्यांशी गैरवर्तन करणे, महिलांशी उद्धट वागणे, युनिफॉर्म न वापरणे आदी तक्रारींमुळे रिक्षा चालक आणि प्रवाश्यांमध्ये दररोज वादाची ठिणगी पडत आहे. यासंदर्भात हजारो प्रवाश्यांच्या तक्रारींची दखल घेत पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सोमवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मणराव दराडे यांना ठोस निर्णय घेवून मीटरप्रमाणे रिक्षा भाडे आकारणीची सक्ती करण्यासाठी विनंती केली. एकदा मीटर प्रमाणे रिक्षा सुरू झाल्या की, त्यात सातत्य राहण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक खाते आणि प्रादेशिक खात्याचे पथक तयार करावे तसेच सुरुवातीला रिक्षा चालकांना या निर्णयांची माहिती व्हावी यासाठी कार्यालयीन आदेशाचे प्रसिद्धी पत्रक काढण्याची सूचना केली. शेअर रिक्षा, अबोली रिक्षा, परमिट नसलेल्या रिक्षा आदिबाबतही चर्चा झाली. पनवेल महापालिका क्षेत्रासह संपूर्ण तालुक्यातील रिक्षा मीटरप्रमाणे भाडे आकारणी करतील याकडे परिणामकारक लक्ष देण्यासाठी ही मोहिम सातत्याने राबविण्यात येईल, असे प्रसिध्दी पत्रक तातडीने काढण्यात आले आहे. त्यामुळे नियमांची पायमल्ली करून रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांना मोठा दणका बसणार आहे. बैठकीत उपप्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज औतारी, मोटार वाहन निरीक्षक निलेश धोटे, प्रशांत शिंदे आदि जण उपस्थित होते.
हेल्पलाईनवर तक्रार करा !
रिक्षा चालकांविषयी कोणतीही तक्रार असल्यास 9004670146 या मोबाईल क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मणराव दराडे यांनी केले आहे. आता प्रवाश्यांनी सतर्क राहून तक्रार करण्यासाठी पुढे येणे गरजेचे असून मनमौजी रिक्षा चालकांना चाप लावण्यासाठी हेल्पलाईनचा आधार घ्यावा असे आवाहन पनवेल संघर्ष समीतीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे.
थांबे तयार करून वाहतूक कोंडी करणाऱ्या रिक्षा चालकांना आवर घालणार
अधिकृत रिक्षा थांबा सोडून त्यासमोर बेकायदेशीर रिक्षा रांग लावून वाहतूक कोंडी करणाऱ्या रिक्षा चालकांवरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पनवेल संघर्ष समितीने केली आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्यास रस्ते मोकळे होण्यास मदत होईल.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!