पनवेल दि.२४: पनवेल शहरातील श्री स्वामी समर्थ मठ, गावदेवीपाडा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत मठात देवीच्या नऊ रूपांचे मनमोहक देखावे आणि आकर्षक आरास करण्यात येत आहे. या उत्सवात पुरुष व महिला भजन, भोंडला, देवीचा चंडिका होम, नित्य नामस्मरण, नित्य पूजा, गोंधळ असे विविधं धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मठात प्रतिपदेला शैलपुत्री देवीची आकर्षक आरास करण्यात आली. शैलपुत्री देवीच्या उजव्या हातात त्रिशूल, डाव्या हातात कमळाचे फूल आणि ललाटावर अर्धचंद्र आहे. तसेच, देवीला विड्याच्या पानांची माळ अर्पण करण्यात आली. तर, पुढील दिवसांत द्वितीयेला ब्रह्मचारिणी, तृतीयेला चंद्रघंटा, चतुर्थीला कुष्मांडा, पंचमीला स्कंदमाता, षष्ठीला कात्यायनी, सप्तमीला कालरात्री, अष्टमीला महागौरी आणि नवमीला सिद्धिदात्री या देवीच्या रूपांचे दर्शन भाविकांना होणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी नित्य उपासना आणि देवी सहस्त्र नामावली भजन पार पडले. मंगळवारी द्वितीयेला नित्य उपासना, सिद्ध कुंजिकास्तोत्र, ११ वेळा दुर्गाकवच, दुर्गा अर्गला स्तोत्र आणि भजन आयोजित आहे. बुधवारी तृतीयेला नित्य उपासना व भजन, गुरुवारी चतुर्थीला नित्य उपासना व स्वामी चरित्र सारामृत भजन, शुक्रवारी ललिता पंचमीला नित्य उपासना, कंकुमार्चन व भजन, शनिवार, रविवार आणि सोमवारी नित्य उपासना, सप्तशती पोथी व भजन, मंगळवारी अष्टमीला नित्य उपासना, देवी सहस्त्रनामावली, भजन व होम, बुधवारी नवमीला नित्य उपासना आणि गुरुवारी दसऱ्याला नित्य उपासना व स्वामी चरित्र सारामृताने नवरात्रोत्सवाची सांगता होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा उत्सव भक्ती आणि उत्साहाने साजरा होत आहे. पनवेल शहर आणि परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उत्सवात सामील व्हावे, असे आवाहन मठाधिपती श्री श्री १०८ श्री महंत सुधाकरदासजी (भाऊ) घरत, अवधूत घरत आणि श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाने केले आहे.
![]()
