पनवेल दि.२५: भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थानिकांनी पोदीहून पनवेलला जोडणाऱ्या पोदी येथील भुयारी मार्गाच्या कामा संदर्भात केलेल्या प्रयत्न व पाठपुराव्याला अखेर यश आले असून या मार्गाचे पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. नवीन पनवेल मधील सेक्टर १५, १५ ए १६ ,पोदी व विचुंवे या भागातून राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी पोदी जवळील रेल्वे गेट ओलांडून किवा एच.डी. एफ.सी. सर्कल च्या पूलावर जावे लागत होते. या पुलावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते, त्यामुळे या भुयारी मार्गाची मागणी करण्यात आली होती. या भुयारी मार्गासाठी १० कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आले आहेत. या आधुनिक पध्दतीने रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक न घेता बांधलेल्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पोदीवरील गेट बंद करण्याचा निर्णिय घेतला. त्यासाठी शक्रवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार होता त्यापर्वी भयारी मार्ग सुरू होणे गरजेचे असल्याने मध्यरात्री महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांचे हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी नगरसेवक अॅडव्होकेट मनोज भुजबळ, अजय बहिरा, नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डॉ. भक्तीकुमार दवे, श्रीकांत बापट, डॉक्टर मनीष बेहेरे, रेल्वेचे मुख्य अभियंता राजू मिश्रा आणि उप अभियंता आशुतोष कुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.