नवी मुंबई दि.१: राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांचे आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 2020 च्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना आणि महिला आरक्षण सोडत आज विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे संपन्न झाली. याप्रसंगी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, राज्य निवडणूक आयोगाचे उपआयुक्त अविनाश सणस, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी व सुरेंद्र पाटील आणि राज्य निवडणूक आयोग व नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. निवडणूक विभागाचे उप आयुक्त अमोल यादव यांनी उपस्थितांना प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. तसेच अनुसुचित जमाती, अनुसुचित जाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण अशाप्रकारे विहित निकष व पध्दतीनुसार सोडत काढण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2020 करीता सन 2011 ची जनगणना ग्राह्य धरण्यात आली असून एकूण 111 सदस्य संख्येमध्ये अनुसूचित जमाती करिता 2, अनुसूचित जाती करिता 10, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग करिता 30 व सर्वसाधारण 69 सदस्य असणार आहेत. त्यापैकी 50 टक्के महिला सदस्य संख्या असणार असून अनुसूचित जमाती 1, अनुसूचित जाती 5, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 15 व सर्वसाधारण 35 अशी 56 महिला सदस्य संख्या असणार आहे. प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2020 (दुपारी 3 वाजेपर्यंत) असणार आहे. या हरकती व सूचना महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालय येथे सादर करता येतील. हरकती व सूचना दाखल करण्यात येणा-या नागरिकांना सुनावणी करीता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. या सोडतीप्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.